पावसाळ्यात उद्भवणाऱ्या फुट अल्सरकडे करु नका दुर्लक्ष, अशी घ्या काळजी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  पावसाळ्यात उद्भवणाऱ्या फुट अल्सरकडे करु नका दुर्लक्ष, अशी घ्या काळजी

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या फुट अल्सरकडे करु नका दुर्लक्ष, अशी घ्या काळजी

HT Marathi Desk HT Marathi
Published Jun 12, 2025 12:37 PM IST

Monsoon Care Tips: पावसाळ्यात अनेक वेळा फुट अल्सरचा त्रास होतो. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जाणून घ्या पावसाळ्यात आपल्या पायांची काळजी कशी घ्यावी.

फुट अल्सर
फुट अल्सर (freepik)

Foot Ulcers During Monsoon: पावसाळ्यात संसर्गाचा धोका आणि जखमा बऱ्या होत नसल्याने पायाच्या अल्सरचा धोक उद्भवतो. म्हणूनच पायाची योग्य स्वच्छता राखणे गरजेचे आहे.पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारचे आजार होतात. या ऋतूत घाणेरड्या पाण्यात बॅक्टेरिया वेगाने पसरतात आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. फुट अल्सरची समस्या असलेल्यांसाठी हा ऋतू आव्हानात्मक ठरू शकतो. चेंबूर येथील सुराणा सेठिया हॉस्पिटलचे व्हॅस्क्युलर सर्जन आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अशांक बन्सल यांनी पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी हे सांगितले.

तुम्हाला माहित आहे का? पायाचे अल्सर हे पायावरील फोड किंवा जखमा आहेत जे सामान्यतः तळव्यांवर आढळून येतात. त्याची कारणं म्हणजे रक्ताभिसरण योग्यरित्या न होणे, मधुमेह किंवा त्वचेवर दीर्घकाळ दाब पडणे. हे अल्सर वेदनादायक असून ते बरे होण्यास बराच वेळ लागतो आणि पावसाळ्यात त्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास संबंधीत व्यक्ती संसर्गास बळी पडू शकते. पावसाळ्यात उच्च आर्द्रता आणि सतत ओलाव्याच्या संपर्कात राहिल्याने, पायाचे अल्सर व्यवस्थापित करणे आणखी कठीण होते आणि संसर्गाची शक्यता वाढू शकते.

लक्षणे कोणती?

पावसाळ्यात त्वचा जास्त काळ ओलसर राहते, ज्यामुळे त्वचेच्या ऊती मऊ होतात आणि बरे होण्यास वेळ लागतो. म्हणून, खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका.

लालसरपणा आणि सूज: हे संसर्ग होण्याच्या चिंताजनक लक्षणांपैकी एक आहे. यात संसर्ग झालेला भाग लालसर किंवा त्या भागावर सूज आलेली दिसून येते.

दुर्गंधीयुक्त स्त्राव: हे जखम आणखी बिघडल्याचे चिन्ह आहे.

वाढलेल्या वेदना: ऊतींमध्ये खोलवर संसर्ग पसरल्याचे हे एक लक्षण आहे.

काळी किंवा जांभळी त्वचा - अशा रंगाची त्वचा ही रक्तपुरवठा सुरळीत नसणे आणि ऊतींचे झालेले नुकसान दर्शवते. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करती तज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहिल.

पावसाळ्यात ही लक्षणे अधिकच वाढतात कारण ओली पादत्राणे, चिखलाच्या पाण्यात चालणे तसेच जास्त आर्द्रता, बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी आदर्श वातावरण तयार करते.

निदान कसे कराल

पायाच्या अल्सरचे निदान हे क्लिनिकल तपासणीद्वारे केले जाऊ शकते आणि संसर्ग तपासण्यासाठी जखमेच्या स्वॅब किंवा रक्त चाचण्या केल्या जाऊ शकतात. तज्ञांना हाडांसंबंधी समस्या अथवा खोलवर ऊतींमध्ये झालेल्या जखमा आढळल्यास एक्स-रे किंवा अल्ट्रासाऊंडची आवश्यकता भासू शकते.

हे आहेत उपचार

- जखम कोरडी आणि स्वच्छ ठेवणे

- प्रिस्क्रिप्शनवर दिलेल्या अँटीबायोटिक क्रीम किंवा तोंडावाटे घेतली जाणारी औषधे वापरणे

- नियमितपणे ड्रेसिंग बदला आणि पायांची योग्य स्वच्छता राखा

- गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपाय कोणते

- घाणेरड्या पाण्याचा संपर्क टाळण्यासाठी वॉटरप्रूफ शूज किंवा सँडल घाला.

- पाय कोरडे ठेवण्यासाठी वारंवार मोजे बदला.

- अनवाणी चालणे टाळा.

- दररोज पायांची तपासणी करा, विशेषतः मधुमेहींनी पायांच्या जखमांकडे दुर्लक्ष करु नका.

- नियमितपणे डॉक्टरांना भेट द्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner