Smoking and Dementia Relation: धूम्रपानामुळे केवळ फुफ्फुसाचा कर्करोग किंवा हृदयाच्या समस्याच नाही तर स्मृतिभ्रंश देखील होतो. होय ते खरंय! धूम्रपान करणाऱ्यांना भविष्यात स्मृतिभ्रंश होण्याचा धोका अधिक असतो. धूम्रपान आणि स्मृतिभ्रंशाच्या बाबतीत तज्ञांचा सल्ला घेणे आणि आपल्या सर्व शंकांचे निरसन करणे ही काळाची गरज आहे. मुंबई येथील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजिस्ट प्रियांका टाटर यांनी धूम्रपानामुळे स्मृतिभ्रंश कसा होतो आणि धूम्रपान सोडवण्यासाठी टिप्स सांगितल्या आहेत.
धूम्रपान करण्यापूर्वी दोनदा विचार करा, कारण त्याचा मेंदूच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो तसेच स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की धूम्रपान केल्याने अल्झायमर्स आणि रक्तवहिन्यासंबंधी स्मृतिभ्रंशाचा धोका वाढतो. हा अल्झायमर सारख्या न्यूरोडीजेनेरेटिव्ह रोगांच्या विकासास हातभार लावू शकतो. निकोटीन सारख्या हानीकारक पदार्थांमुळे मेंदुवर हानिकारक परिणाम होतात. निकोटीन हा सिगारेटमधील मुख्य घटक जो न्यूरोट्रांसमीटरच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतो, स्मरणशक्ती आणि एकाग्रता बिघडवतो. शिवाय धूम्रपान केल्याने रक्त प्रवाह आणि ऑक्सिजनच्या प्रवाहावर परिणाम होऊन मेंदूवर दुष्परिणाम होतात. सिगारेटच्या धुरात असलेले विषारी पदार्थ रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात. ज्यामुळे मेंदूच्या पेशींना पोषण आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे जळजळ होणे आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढू शकतो, जे स्मृतिभ्रंशासाठी कारणीभूत ठरतात. मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी आणि भविष्यात स्मृतिभ्रंश सारखी दुर्बल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी करण्यासाठी धूम्रपान सोडणे महत्त्वाचे आहे.
संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की धूम्रपान केल्याने आधीच स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांमधील लक्षणांच्या प्रगतीला वेग येऊ शकतो. सिगारेटच्या धुरातील विषारी रसायने मेंदूतील रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे रक्त प्रवाह आणि ऑक्सिजनची पातळी कमी होते. धूम्रपान करणाऱ्यांना या गंभीर धोक्याची जाणीव असणे आवश्यक आहे आणि त्यांच्या मेंदूच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि नंतरच्या आयुष्यात स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता कमी करण्यासाठी धूम्रपान सोडण्याच्या दिशेने पावले उचलणे आवश्यक आहे.
- धूम्रपान सोडण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे अचनाक न सोडता हळूहळू सिगारेटचे सेवन कमी करणे. ही पद्धत तुमचे शरीर आणि मन हळूहळू संतुलित करण्यास मदत करते. तुम्ही प्रत्येक दिवसासाठी किंवा आठवड्यासाठी एक विशिष्ट ध्येय आखुन त्यास सुरुवात करू शकता. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे ते सोडू शकत नाही तोपर्यंत तुम्ही सिगारेटची दिवसाची संख्या हळूहळू कमी करू शकता.
- क्रेविंग आणि ट्रिगर्सचा सामना करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधणे. यामध्ये माइंडफुलनेस तंत्राचा सराव करणे, व्यायाम किंवा योग यासारख्या शारीरिक क्रियांमध्ये गुंतणे किंवा धुम्रपान करण्याची इच्छा निर्माण झाल्यावर स्वतःचे लक्ष विचलित करण्यासाठी एखादा नवीन छंद शोधणे यांचा समावेश असू शकतो.
- आरोग्यदायी पर्यायांसह सवय बदलून आपण धूम्रपानावर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी करुन हळूहळू ही सवय सोडू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या