How much rice to eat in a day: भारतीय लोक खाण्याचे शौकीन असतात. भारतीयांना नेहमीच नवनवीन पदार्थ खायला आवडतात. दुसरीकडे भात हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि देशातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळाचा भात खाल्ला जातो. पण भात खाण्याबाबत लोकांचा असा विश्वास आहे की, भाताच्या सेवनाने वजन वाढते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित करण्यासाठी लोक भात खाणे बंद करतात. अशा परिस्थितीत भाताच्या सेवनाने खरंच लठ्ठपणा वाढतो का? असा प्रश्न पडतो. याशिवाय भाताचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? त्याचे सेवन फायदेशीर आहे की हानिकारक? असे अनेक विचार आपल्या डोक्यात येत असतात. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
आहार तज्ज्ञांच्या मते, तांदळात प्रामुख्याने कर्बोदके असतात. जे ऊर्जेचे मुख्य स्त्रोत आहेत. पांढऱ्या तांदळामध्ये (रिफाइन्ड तांदूळ) जास्त कर्बोदके आणि कमी फायबर असतात. त्यामुळेच जास्त प्रमाणात पांढरा तांदूळ खाल्ल्याने वजन वाढू शकते. विशेषत: जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे बैठे काम करत असाल. तुमची शाररिक हालचाल फारशी होत नसेल. तर वजन वाढवण्याची शक्यता अधिक असते.
परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, भातामुळेच वजन वाढत नाही. तर ते तुम्ही ते कोणत्या प्रमाणात आणि पद्धतीने खात आहात यावर अवलंबून असते. तज्ज्ञांच्या मते, भात मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढत नाही. यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढत नाही. परंतु भाताचे प्रमाण जास्त आणि शारीरिक हालचाली कमी असे असल्यास वजन वाढू शकते.
तज्ज्ञ सांगतात की, पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत तपकिरी तांदळात (ब्राऊन राईस) जास्त फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ब्राऊनम राईस हळूहळू पचते, ज्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे दररोज खाण्यासाठी आहारात ब्राऊन राईसचा समावेश केलेलं उत्तम असते. शिवाय आहारात भाताचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. सामान्य प्रौढ व्यक्तीसाठी, एका वेळी जवळपास १ ते १.५ वाटी तांदूळ पुरेसे आहे. भात नेहमीच डाळ, भाजी, कोशिंबीर किंवा दह्यासोबत खावे. हे मिश्रण तुमचे अन्न संतुलित करते. तसेच जास्त तेलात बनवलेला भात खाणे टाळा. यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढते.
आहार तज्ज्ञांच्या मते कोणता पदार्थ कोणत्या वेळेत खातो यावरसुद्धा बरंच काही ठरत. कारण त्यावेळेत तुमच्या शारीरिक हालचाली किती आणि कशा असतात यावर वजन वाढणे किंवा घटने अवलंबून असते. त्यामुळेच आयुर्वेदात भात खायचीसुद्धा एक ठराविक वेळ असते. भात खाण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपारचे जेवण होय. यावेळी शरीराची पचनशक्ती जास्त असते आणि भातापासून मिळणारी ऊर्जा दिवसभर वापरता येते. जर तुम्ही रात्री भात खात असाल तर हलकेच खा आणि प्रमाण मर्यादित ठेवा. रात्री शरीराची पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे भात पचायला जास्त वेळ लागतो. बऱ्याच वेळा हे वजन वाढविण्यासाठी कारणीभूत ठरते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)