Facts about milk In Marathi: दररोजच्या आयुष्यात मानवाच्या आरोग्यासाठी दूध फारच आवश्यक आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण दूध आवडीने सेवन करतात. परंतु दुधाबाबत अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की, दूध शाकाहारी आहे की ते मांसाहारी आहे. काहींच्या मते दुध प्राण्यांपासून मिळणाऱ्या फॅटमुळे त्याला मांसाहारी म्हणता येईल. तर हिंदू धर्मात आणि भारतीय संस्कृतीत दुधाला सात्विक आणि शाकाहारी मानले जाते. हा वाद नेहमीच पाहायला मिळतो. आज आपण दुधाबाबत एक्सपर्ट नेमके काय सांगतात हे जाणून घेणार आहोत.
न्यूज १८ च्या एका रिपोर्ट्सनुसार एका तज्ज्ञाने दूध शाकाहारी की मांसाहारी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते. पण एक्सपर्टने नेमकं काय सांगितलं आहे ते आपण पाहूया. दूध हे मांसाहारी की शाकाहारी असा वाद निर्माण होतो कारण ते जनावरांपासून मिळते. काही लोकांचा असा विश्वास आहे की, दुधामध्ये प्राण्यांची चरबी असते, ज्यामुळे ते मांसाहारी बनते. याशिवाय अनेक लोक असा युक्तिवाद देखील करतात की दुधामध्ये रक्तासारख्या द्रव पेशींचा समूह देखील असतो, ज्यामुळे ते मांसाहारी मानले जाते. दुसरीकडे, हिंदू धर्मात दूध हा सात्विक आणि शाकाहारी आहाराचा एक भाग मानला जातो. धार्मिक विधींमध्येही याचा वापर केला जातो. त्यामुळे हा विषय नेहमीच चर्चेत असतो.
पशुवैद्य डॉ.बी.एल.पटेल यांच्या मते दूध हे अजिबात मांसाहारी नाही. दूध हे प्राण्यांचे मांस नसून ते प्राण्यांच्या दुग्ध ग्रंथीतून स्रवलेला नैसर्गिक द्रव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुधात अंड्यांप्रमाणे जैव पेशी नसतात, त्यामुळे ते मांसाहाराच्या श्रेणीत ठेवता येत नाही. ते म्हणतात की जनावरांच्या स्तन ग्रंथींमध्ये दूध तयार होते आणि त्यात प्रथिने, फॅट आणि पाणी यांचे मिश्रण असते, ज्यामुळे ते शाकाहारी आणि आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक बनते.
मांस आणि दूध यांच्या रचनेत मोठा फरक असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. मांस अर्ध-घन असे म्हटले जाऊ शकते. तर दूध द्रव स्वरूपात असते. हिमोग्लोबिनमुळे मांसामध्ये लाल रंग असतो. तर दुधाचा रंग पांढरा किंवा हलका पिवळा असतो. गाईच्या दुधाचा हलका पिवळा रंग व्हिटॅमिन ए च्या उपस्थितीमुळे असतो. शिवाय, मांस शिजवल्यावर त्याची रचना बदलते, तर दुधाचे प्रथिने आणि इतर घटक कितीही वेळ उकळले तरी ते जसेच्या तसे राहतात. त्यामध्ये थोडासाही बदल होत नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)