Misconceptions About Cosmetic Surgery: चेहरा किंवा शरीरावरील दोष दूर करण्यासाठी कॉस्मेटिक शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला जातो. आत्मविश्वास वाढवण्यासाठी, वैद्यकीय समस्या दूर करण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी या प्रक्रिया केल्या जातात. नाकाची शस्त्रक्रिया किंवा राइनोप्लास्टी म्हणजे, एखाद्या व्यक्तीच्या नाकावर शस्त्रक्रिया करून त्याला नवीन आकार देणे. शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश नाकाचा आकार बदलणे किंवा श्वास घेण्याची क्षमता वाढवणे किंवा दोन्ही असू शकतो. दिवसेंदिवस प्लॅस्टिक सर्जरीला पसंती मिळत असून त्याबाबत समाजामध्ये बरेच गैरसमज पहायला मिळतात. द एस्थेटिक क्लिनिकचे वरिष्ठ कॉस्मेटिक सर्जन आणि संचालक डॉ. देबराज शोम यांनी या गैरसमजूतीबाबत वास्तविकता सांगितले.
१. कॉस्मेटिक सर्जरी ही केवळ श्रीमंतांसाठी आहे, असा मोठा गैरसमज लोकांमध्ये आढळून येतो. मात्र कॉस्मेटिक शस्त्रक्रियेसाठी जरी मोठ्या प्रमाणात खर्च होत असला तरी वेगवेगळ्या बजेटमध्ये यासंबंधी विविध पर्याय उपलब्ध आहेत. आपण नेमके काय शोधत आहात याबद्दल आपल्या तज्ञाशी चर्चा करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर कोणती शस्त्रक्रिया आपल्यासाठी योग्य आहे हे ठरवू शकता.
२. कॉस्मेटिक सर्जरी फक्त वृध्दांसाठी आहे हा देखीस एक गैरसमजच आहे. वास्तविक कॉस्मेटिक सर्जरी ही विशिष्ट वयोगटावर आधारित नसून प्रत्येक वयोगटातील व्यक्ती स्तनांची वृध्दी, नाकाची शस्त्रक्रिया किंवा राइनोप्लास्टी किंवा लायपोसक्शन (शरीरातील चरबी काढणे) हे पर्याय निवडू शकतात आणि इच्छित परिणाम मिळवू शकतात.
३. कॉस्मेटिक सर्जरी हे सुडौल शरीरासाठी प्रभावी उपाय आहे असाही गैरसमज लोकांमध्ये आढळून येतो. लायपोसक्शन (शरीरातील चरबी काढणे) सारखी कॉस्मेटिक सर्जरी ही शरीरातीस अतिरिक्त चरबी काढून टाकते मात्र हा वजन कमी करण्याचा पर्याय नाही.
४. कॉस्मेटिक शस्त्रक्रियेने एखाद्या व्यक्तींमध्ये तीव्र बदल घडवून आणता येतात हा देखील गैरसमज समाजात पहायला मिळतो. वास्तविकता शल्यचिकित्सक तुम्हाला नैसर्गिक परिणामांची खात्री देतात. कॉस्मेटिक प्रक्रिया ही एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्यात पूर्णतः बदल न करता आपली वैशिष्ट्ये सुधारण्यासाठी केली जाते. इच्छित परिणाम या पर्यायाचा वापर केला जातो.
५. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये वेदना आणि पुनर्प्राप्तीस जास्त कालावधी लागतो असा गैरसमज असतो. वास्तविकता प्रत्येक शस्त्रक्रियेमुळे किरकोळ अस्वस्थता निर्माण होते आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे एकूण अनुभवही सुधारतो. या प्रक्रियेत कमीत कमी वेदना आणि पुनर्प्राप्तीचा कालावधी देखील कमी आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती दैनंदिन कामांना लगेचच सुरूवात करू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)