Kitchen Tips : तुमच्या किचनमधल्या 'या' ५ गोष्टी ठरू शकतात कॅन्सरचं कारण, लगेचच बंद करा याचा वापर
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips : तुमच्या किचनमधल्या 'या' ५ गोष्टी ठरू शकतात कॅन्सरचं कारण, लगेचच बंद करा याचा वापर

Kitchen Tips : तुमच्या किचनमधल्या 'या' ५ गोष्टी ठरू शकतात कॅन्सरचं कारण, लगेचच बंद करा याचा वापर

HT Marathi Desk HT Marathi
Updated Apr 04, 2024 06:38 PM IST

Kitchen health tips : तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील काही गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. दररोजचं जेवण बनवताना तुम्ही या ५ गोष्टींचा वापर करत असाल, तर ते तुमच्या कुटुंबासाठी हानीकारक ठरू शकतं. यामुळे कॅन्सर (Cancer) व इतरही गंभीर आजार बळावले जाऊ शकतात.

तुमच्या किचनमधल्या 'या' ५ गोष्टी ठरू शकतात कॅन्सरचं कारण, लगेचच बंद करा याचा वापर
तुमच्या किचनमधल्या 'या' ५ गोष्टी ठरू शकतात कॅन्सरचं कारण, लगेचच बंद करा याचा वापर

Kitchen Tips : अनेकदा असं म्हटलं जातं, आजार हे पोटापासून सुरू होतात. त्यामुळे आपण काय खातो, कुठे आणि कशा प्रकारे बनवलेलं खातो हेही तितकंच महत्त्वाचं ठरतं. कोरोना काळापासून घरगुती जेवणं किंवा स्वच्छतेच्या बाबतीत अनेकजण अधिक जागरुक झाल्याचं पाहायला मिळतं. घरात जेवण बनवतानाही काही गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

तुमच्या किचनमधीलच काही वस्तू तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक, हानीकारक ठरू शकतात. त्यामुळं तुमच्या स्वयंपाकघरात तुम्ही या ५ गोष्टींचा वापर करत असाल, तर त्या गोष्टी लगेच बदलणं, किचनमधून बाहेर काढणं महत्त्वाचं आहे. या ५ गोष्टी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देत असून इतरही अनेक आजारांसाठी कारणीभूत ठरतात. जाणून घ्या किचनमधल्या या ५ शरीरावर दुष्परिणाम करणाऱ्या गोष्टी.

नॉन स्टिकची भांडी

भारतीय स्वयंपाकघरांमध्ये नॉन स्टिकची भांडी अगदी सर्रास वापरली जातात. जेवण बनवताना पदार्थ खाली चिकटू नये यासाठी अनेक महिला या भांड्यांचा सर्वाधिक वापर करताना दिसतात. पण ही भांडी दिसायला, वापरायला जितकी सोपी, तितकीच ती शरीरासाठी हानीकारक आहेत. नॉन स्टिकची भांडी बनवताना त्याच्या कोटिंगसाठी पीएफओ नावाच्या केमिकलचा वापर केला जातो. अनेक अभ्यासातून पीएफओमुळे कॅन्सर होत असल्याचं समोर आलं आहे. या भांड्यांमध्ये जेवण बनवताना उष्णता निर्माण झाल्यानंतर त्यातून विषारी वायू निघतो. या भांड्याचं कोटिंग जेवणासह पोटात जातं, त्यामुळे कॅन्सरचा धोक निर्माण होतो. त्यामुळे नॉन स्टिकची भांडी तुमच्या स्वयंपाकघरातून बाहेर काढाणं संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय फायद्याचं आहे.

अ‍ॅल्युमिनियम फॉइल

सध्या अ‍ॅल्युमिनियम फॉइल अनेकांच्या किचनमध्ये सहज दिसणारी वस्तू आहे. चपाती, ब्रेड, पराठा असे अनेक पदार्थ पॅक करण्यासाठी या अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गरम पदार्थ या फॉइलमध्ये बंद केल्यानंतर त्यातील अ‍ॅल्युमिनियम ठेवलेल्या पदार्थात शोषून घेतलं जातं. तेच पदार्थ पोटात जाऊन यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो.

प्लास्टिकची भांडी आणि बाटल्या

नॉन स्टिकच्या भांड्यासोबत अनेक स्वयंपाक घरांमध्ये प्लास्टिकची भांडी आणि पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या अगदी सहज दिसतात. अनेकजण गरम जेवण या प्लास्टिकच्या डब्ब्यांमध्येही घेऊन जातात. पण रोजच्या वापरातील हे प्लास्टिक आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. प्लास्टिकची बाटली किंवा भांड्यामध्ये बिस्फिनोले नावाचं केमिकल असतं. या केमिकलचा वापर प्लास्टिकची भांडी किंवा बाटली बनवताना केला जातो. या केमिकलने बनवलेल्या वस्तू रोजच्या वापरात असतात. त्यामुळे हार्मोनल इम्बॅलेन्स, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.

प्लास्टिक चॉपिंग बोर्ड

स्वयंपाक घरात जेवण बनवताना भाज्या, फळं कापण्यासाठी प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डचा वापर केला जातो. पण सतत या चॉपिंग बोर्डच्या वापराने भाजी कापताना त्यासोबत प्लास्टिकचे अत्यंक सूक्ष्म, डोळ्यांनाही न दिसणारे कण भाजीमध्ये मिसळतात आणि ते आपल्या पोटात जातात. या प्लास्टिकच्या चॉपिंक बोर्डमुळे पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण होतो.

रिफाइंड शुगर

घरी अनेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो. कित्येकांना जेवणानंतर गोड खाण्याचीही सवय असते. पण या सततच्या रिफाइंड शुगरच्या सेवनाने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. रिफाइंड शुगर कॅन्सरच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत ठरतं. त्यामुळे रिफाइंड शुगरचं अतिसेवन, नियमित सेवन हानीकारक ठरू शकतं.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याच्याशी सहमत असेलच असं नाही. अनुकरण करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner