Diwali 2024 Special Mithai Recipe : दिवाळीच्या सणाला प्रत्येकाला मिठाई खावीशी वाटते, पण अनेक वेळा मधुमेही रुग्णांना मिठाईचा आस्वाद घेता येत नाही. मिठाईमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. आजकाल बाहेर विकत मिळणाऱ्या शुगर फ्री मिठाईतही भेसळ होऊ लागली आहे. मात्र, यापासून दूर राहत तुम्ही यंदाच्या दिवाळीत घरगुती मिठाईचा आस्वाद घेऊ शकता आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही. याशिवाय ‘या’ मिठाई बनवायलाही सोप्या आहेत. इतकंच नाही तर, मधुमेही रुग्ण देखील कोणतेही टेन्शन न घेता हे पदार्थ खाऊ शकतात. चला जाणून घेऊया या मिठाईंच्या खास रेसिपी.
नारळ गुळाचे मोदक हे आपल्या रेग्युलर मोदकाचं हेल्दी व्हर्जन आहे. यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो. हा मोदक बनवण्यासाठी १ टेबलस्पून तूप, १ वाटी किसलेले खोबरे, १/२ कप गूळ आणि चिमूटभर वेलची पूड घेऊन हे सर्व व्यवस्थित भाजून त्याचे मिश्रण तयार करून घ्या. यानंतर गरम पाण्यात १ कप तांदळाचे पीठ मळून घ्या. कणकेला एका छोट्या वाटीचा आकार द्या आणि त्यात नारळ-गुळाचे मिश्रण भरून मोदकाचा आकार द्या. यानंतर १० मिनिटे मोदक वाफवून घ्या. शेवटी थंड करून सर्व्ह करा.
नाचणीचा हलवा केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. हा हलवा बनवण्यासाठी, १ कप नाचणीचे पीठ २ चमचे तुपात सुगंध येईपर्यंत तळून घ्या. दुसरीकडे, १ कप गरम पाण्यात १/२ कप गूळ विरघळवून घ्या. यानंतर, भाजलेल्या नाचणीमध्ये हळूहळू गुळाचे पाणी घाला आणि सतत ढवळत राहा, जेणेकरून हलव्यात गुठळ्या होणार नाहीत. हलवा तयार झाल्यावर ड्रायफ्रुट्सने सजवा आणि सर्व्ह करा. नाचणीचा हलवा कॅल्शियम, लोह आणि फायबरने समृद्ध आहे.
ओट्स आणि बदामापासून बनवलेले लाडू नेहमीच्या लाडूपेक्षा अधिक आरोग्यदायी आहेत. हे लाडू बनवण्यासाठी १ कप ओट्स हलके सोनेरी होईपर्यंत कोरडे भाजून घ्या आणि ते जाडसर दळून घ्या. दुसऱ्या भांड्यात अर्धी वाटी बदाम भाजून त्याची भरड करून घ्या. यानंतर १ टेबलस्पून तूप गरम करून त्यात १ कप गूळ घालून वितळवून पाक तयार करून घ्या. गुळाच्या पाकात ओट्स, बदाम आणि चिमूटभर वेलची पावडर मिसळा. या मिश्रणाचे लाडू वळून घ्या आणि घट्ट झाले की सर्व्ह करा.
क्विनोआ खीरमध्ये भरपूर पोषक घटक असतात. ही खीर बनवण्यासाठी १ कप क्विनोआ दुधात शिजवा. यानंतर त्यात शुगर फ्री किंवा गूळ घाला आणि यानंतर चिमूटभर वेलची पूड घाला आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. सगळ्यात शेवटी बदामांचे काप लावून सजवा आणि सर्व्ह करा.
संबंधित बातम्या