Diwali face pack: दिवाळीच्या सणाआधी लोक आपली घरे, कार्यालये आणि कामाची ठिकाणे पूर्णपणे स्वच्छ करतात. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला फक्त स्वच्छ स्थान आवडते. अशा परिस्थितीत लोक सण येण्याआधी आपले घर चांगले स्वच्छ करतात. स्वच्छतेचा थेट परिणाम लोकांच्या त्वचेवर होतो. यामुळे त्यांची त्वचा खूप निस्तेज दिसू लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला दिवाळीत तुमची त्वचा चमकदार दिसावी असे वाटत असेल, तर तुमच्या चेहऱ्यावर अशा काही गोष्टींचा वापर करा ज्यामुळे झटपट चमक येते. आता दिवाळीला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आजच तुम्ही चेहऱ्यावर अशा गोष्टी वापरा, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल. येथे आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्याचा वापर तुम्ही चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी करू शकता.
नरक चतुर्दशीच्या दिवशी असणाऱ्या अभ्यंगस्नानाला उटणे लावण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत बेसन, हळद, चंदन आणि गुलाबपाणी यांचे मिश्रण तयार करून त्याचा वापर करू शकता. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटांनी हलक्या हाताने मसाज करून धुवा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचा चमकदार होते.
एलोवेरा म्हणजेच कोरफड त्वचेला थंडपणा आणि आर्द्रता देते. याच्या वापराने त्वचा आतून स्वच्छ होते. अशा स्थितीत चेहऱ्यावर कोरफड लावून आज आणि उद्या रात्री चेहऱ्यावर राहू द्या आणि सकाळी धुवा. यामुळे त्वचेवर चमक येते आणि पिंपल्सही कमी होतात.
मध आणि दह्याचा पॅक त्वचेला मॉइश्चरायझ करतो आणि तिला नैसर्गिक चमक देतो. हा पॅक १५ मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल.
जर तुमच्या घरी काकडी असतील तर तुमची त्वचा सुधारण्यासाठी त्याचा वापर करा. यासाठी काकडीचा रस आणि लिंबूचा रस या दोन्ही गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचेचा रंग उजळेल. आणि त्वचा चमकदार दिसेल.
दुधाची साई म्हणजेच मलई आणि गुलाबपाणीचे मिश्रण त्वचा मऊ करते आणि त्यात आर्द्रता राखते. ते चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. या मिश्रणामुळे तुमचा चेहरा मुलायम होईल आणि गुलाबपाणी तुमचा चेहरा ताजेतवाने ठेवेल.
कडुनिंब आणि मुलतानी माती दोन्ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. तुमचा चेहरा उजळण्यासाठी तुम्ही त्याचा फेस पॅक तयार करू शकता. यासाठी मुलतानी मातीमध्ये कडुनिंबाची पावडर मिसळा आणि नंतर त्यात गुलाबजलाचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करा. आता ते लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
संबंधित बातम्या