what is type 2 diabetes: तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहासारखे गंभीर आजार होऊ शकतात. काही खाद्यपदार्थ आहेत जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे इन्सुलिन रेसिस्टंट निर्माण होऊ शकते आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे. ज्यावर कायमस्वरूपी कोणताही इलाज सध्या उपलब्ध नाही. हा आजार उत्तम आहार आणि व्यायामानेच नियंत्रित केला जाऊ शकतो. तुम्ही रोज जे पदार्थ खाता ते मधुमेहाचा धोका वाढवतात. आज आम्ही तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारातील अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मधुमेह होऊ शकतो.
सोडा, पॅकेज्ड ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये रिफाइंड शुगरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज झपाट्याने वाढते. त्यांचे नियमित सेवन केल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि वजन वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
व्हाईट ब्रेड आणि पेस्ट्रीमुळेही मधुमेहाचा धोका वाढतो. व्हाईट ब्रेड, पेस्ट्री आणि केक हे पिठापासून बनवले जातात ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. या पदार्थांचे जास्त सेवन केल्याने इन्सुलिनचा प्रतिकार होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका संभवतो.
पांढरा तांदूळ पॉलिश केल्याने त्यातील फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे काढून टाकली जातात. ज्यामुळे ते हाय ग्लायसेमिक अन्न बनते. याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होऊ शकते आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
सॉसेज, हॉट डॉग आणि डेली मीट यांसारख्या प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये प्रिझर्वेटिव्ह, मीठ आणि फॅट्स जास्त असतात. त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनसंस्था आणि जळजळ यावर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
समोसे, जिलेबी आणि तळलेले चिकन यांसारख्या तळलेल्या पदार्थांमध्ये अनहेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे जळजळ, वाढलेली कोलेस्टेरॉल आणि इन्सुलिन रेझिस्टन्स यासारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. याशिवाय बटाट्याचे चिप्स आणि इतर पॅकेज केलेल्या स्नॅक्समध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, आणि मीठ जास्त असते. या स्नॅक्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहाची शक्यता वाढते.
दुग्धजन्य पदार्थ हे आरोग्यदायी आहाराचा भाग मानले जात असले तरी, दूध, चीज आणि मलईच्या फुल्ल फॅट्सच्या प्रकारांमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन वाढू शकते आणि इन्सुलिनचा प्रतिकार होऊ शकतो. या दोन्ही समस्यांमुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)