Diabetes Care Tips: मधुमेहासह जगणे म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी करत असल्यासारखे वाटू शकते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत रक्तातील शर्करेच्या प्रमाणावर देखरेख ठेवावी लागते, आहार नियोजन करावे लागते आणि व्यायाम नित्यक्रमाचे पालन करावे लागते. तसेच, दैनंदिन क्रियाकलापांचा रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर परिणाम होऊ शकतो आणि अचानक होणाऱ्या बदलांसाठी तयार असावे लागते, याचा देखील विचार करणे आवश्यक आहे. डायबेटिस डिस्ट्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जबाबदारी व चिंतांच्या अविरत चक्राचा भारतातील जवळपास ३३ टक्के टाईप २ मधुमेहाने पीडित व्यक्तींवर परिणाम झाला आहे.
दैनंदिन जीवनात तणावाला सामोरे जाण्यासोबतच मधुमेही रुग्णांसाठी स्वतःची काळजी घेणे नक्कीच त्रासदायक ठरू शकते. यामुळे मानसिक थकवा व तणाव येऊ शकतो. तसेच वाढती चिडचिड, वेगळे असण्याची भावना व बर्नआऊट होऊ शकते. अशा भावनांमुळे मधुमेहाचे व्यवस्थापन करणे अवघड होऊ शकते. शारीरिक व्यायाम करणे, आरोग्यदायी आहाराचे सेवन करणे, कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग डिवाईसेस सारख्या साध्या टूल्सच्या माध्यमातून रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर देखरेख ठेवणे, अशा साध्या उपाययोजनांसह व्यक्ती मधुमेहाचे व्यवस्थापन करू शकतात आणि आरोग्य उत्तम ठेवू शकते’, असे मुंबईतील स्पेशालिटी डायबेटिस अँड थायरॉईड क्लिनिक्सचे संचालक डॉ अभिजीत जाधव म्हणतात.
समस्या जाणून घ्या: आरोग्यसंबंधित कोणत्याही आव्हानाचे निराकरण करण्याचे पहिले पाऊल म्हणजे त्यासंदर्भात असलेल्या समस्येबाबत जाणून घेणे. आरोग्याची काळजी घेताना त्यामध्ये चढ-उतार होणे स्वाभाविक आहे, पण सतत तणाव आणि त्रासदायक भावना डायबेटिस डिस्ट्रेसचे लक्षण असू शकते. यासाठी आधी लक्षणे व पॅटर्न्स ओळखण्यास सुरूवात करा. तुम्हाला आवश्यक असलेला पाठिंबा मिळवण्यासाठी तुमच्या भावना व देहबोलीकडे लक्ष द्या. तसेच, सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशननुसार मधुमेह असलेल्या व्यक्ती नैराश्य अनुभवण्याचे प्रमाण अधिक आहे. नैराश्याची लक्षणे जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
उपचार योजना आखा: मधुमेह आणि त्यासंदर्भात सामना कराव्या लागणाऱ्या आव्हानांबाबत खुल्या मनाने सांगणे योग्य उपचार मिळण्यासाठी महत्त्वाचे आहे. आरोग्य स्थितीचे व्यवस्थापन करताना एकटेपणा जाणवू शकतो, कारण तुम्हाला त्यासंदर्भात अनेक बदल करावे लागतात. प्रियजनांसमोर तुमच्या भावना व्यक्त करा. शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत डॉक्टरांसोबत प्रामाणिकपणे सल्लामसलत करा. यामुळे त्यांना तुमच्या मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी वैयक्तिकृत योजना आखण्यास, तसेच औषधोपचार व सपोर्ट ग्रुप्स तयार करण्यास मदत होईल. दैनंदिन व्यवस्थापनामध्ये तंत्रज्ञानाची देखील मोठी मदत होऊ शकते. फ्रीस्टाइल लिब्रे सारखे कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटर्स (सीजीएम) तुम्हाला बहुमूल्य माहिती देऊ शकतात आणि तुम्हाला स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम करू शकतात.
आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा: यात महत्त्वाचे म्हणजे संतुलन राखणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेले क्रियाकलाप आणि आरोग्यसंबंधित ध्येये जाणून घ्या. यामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन योग्यरित्या होण्यासोबत दीर्घकाळापर्यंत आरोग्य उत्तम राहिल. तंत्रज्ञानाची देखील मोठी मदत होऊ शकते. ट्रॅकर्ससारखे टूल्स रक्तातील शर्करेच्या पातळ्यांसारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर देखरेख ठेवू शकतात, अतिरिक्त मेहनतीशिवाय तुमच्या नित्यक्रमामध्ये सहजपणे सामावून जाऊ शकतात. स्वत:ची काळजी घ्यायला विसरू नका. दैनंदिन जीवनात गंभीर आजाराचे संतुलन राखणे अवघड आहे आणि त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचा आनंद घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)