Tips to Prevent Diabetes Kidney Problem: डायबेटिक किडनी डिसीज याला डायबेटिक नेफ्रोपॅथी असेही म्हणतात. ही मधुमेहासंबंधीची गंभीर गुंतागुंत मानली जाते, जी आपल्या किडनीवर परिणाम करते. म्हणूनच याला "सायलेंट किलर" असे संबोधले जाते आणि या स्थितीचे मुख्य कारण म्हणजे रक्तातील साखरेची पातळी सतत वाढत जाणे. ज्यामुळे किडनीतील लहान रक्तवाहिन्यांचेही नुकसान होऊ शकते. यामुळे किडनीची कार्यक्षमता कमी होते आणि मूत्रपिंडाच्या ऊतींना जखम होते. मधुमेहाच्या मूत्रपिंडाच्या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे प्रोटीन्युरिया, म्हणजे मूत्रात प्रथिने आढळून येणे. इतर सामान्य लक्षणांमध्ये पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणे, थकवा येणे आणि भूक मंदावणे यांचा समावेश होतो. हा रोग जसजसा वाढत जातो तसतसे मूत्रपिंडाचे कार्य कमी झाल्यामुळे व्यक्तींना उच्च रक्तदाब आणि अशक्तपणा येऊ शकतो. मधुमेही लोकांमध्ये दीर्घकालीन किडनी रोगाचे प्रमाण ३०-४० % इतके जास्त आहे, ज्याला मधुमेही किडनी रोग (diabetic kidney disease) असे म्हणतात. मुंबई येथील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. रुजू गाला यांनी याबाबत माहिती दिली.
मधुमेहाच्या मूत्रपिंडाच्या आजारावरील उपचारांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे, रक्तदाबाचे व्यवस्थापन करणे आणि किडनीचे नुकसान कमी करणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या किडनीच्या आजाराच्या अधिक प्रगत अवस्था असलेल्यांसाठी उपचारांमध्ये डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण यांचा समावेश असू शकतो. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी त्यांच्या विशिष्ट गरजा आणि उपचारांकरिता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डायबेटीक किडनी सारख्या समस्येला प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हा मधुमेहाचा परिणाम अतिशय गंभीर आणि जीवघेणी गुंतागुंत निर्माण करणारा आहे. किडनी खराब झाल्यानंतर रक्त योग्यरित्या फिल्टर करण्याची त्यांची क्षमता धोक्यात येते. ज्यामुळे शरीरात कचरा आणि द्रव साठते. उच्च रक्तदाबामुळे देखील किडनी निकामी होऊ शकते. डायबेटीक किडनीची समस्येवर उपचार करणे आव्हानात्मक ठरु शकते आणि अनेकदा डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण यांसारख्या उपचारांची आवश्यकता भासते. रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलच्या योग्य व्यवस्थापनाद्वारे प्रतिबंध करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने ही दुर्बल स्थिती विकसित होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो. डायबेटिक किडनीची समस्या टाळण्यासाठी वेळीच उपचार करणे तसेच किडनीची कार्यक्षमता टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
किडनीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. वेळोवेळी तपासणी केल्याने तुम्हाला रक्तातील साखरेच्या पातळीतील वाढ किंवा ओळखण्यात मदत होऊ शकते. किडनीचे नुकसान आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यासाठी तुमची HbA1c पातळी ७% च्या खाली असेल याची खात्री करा. फळे, भाज्या, तृणधान्य आणि कडधान्ये यांसारख्या पौष्टिक पदार्थांची निवड करून आपल्या आहाराकडे लक्ष द्या. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि उच्च सोडियमयुक्त अन्नाचे सेवन मर्यादित करा. कारण ते मूत्रपिंडाचे कार्य बिघडवू शकतात आणि त्यामुळे वजनही वाढू शकते. आहारतज्ञांशी सल्ला घेतल्याने तुमच्या आहाराच्या गरजेनुसार आणि किडनीच्या आरोग्यास योग्य असे डायट मदत करु शकते. मधुमेह आणि किडनी रोग दोन्ही व्यवस्थापित करण्यासाठी शारीरिकरित्या सक्रिय राहणे महत्वाचे आहे.
नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास, रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे नियंत्रित करण्यात मदत होते. दिवसातून किमान ३० मिनिटे चालणे, व्यायाम करणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारख्या व्यायामांचा सराव करा जेणेकरून आरोग्यासंबंधीत तक्रारींपासून दूर राहता येईल आणि मधुमेहाच्या मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे कमी करता येतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या