Dahi Kadhi Recipes: कढी हा एक प्रसिद्ध भारतीय पदार्थ आहे, जो देशभरातील जवळजवळ सर्व घरांमध्ये बनवला जातो. कढीची चव जबरदस्त असते. दही कढी ही भात किंवा पोळीबरोबर सर्व्ह केली जाते. तुम्हालाही दही कढी खायला आवडत असेल, तर या ३ वेगवेगळ्या चविष्ट आणि चटपटीत रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. नोट करा ३ सोप्या चटपटीत पाककृती…
• दही: २ कप
• बेसन: २ टीस्पून
• नारळाचे बारीक तुकडे: १/२ कप
• हिरव्या मिरच्या: ३
• जिरे: १ टीस्पून
• पिकलेल्या आंब्याचे तुकडे: १ कप
• हळद: १/२ टीस्पून
• कढीपत्ता: १० पाने
• लाल मिरच्या: २
• मोहरी: १ टीस्पून
• हिंग : चिमूटभर
• मीठ : चवीनुसार
• तेल : २ टीस्पून
कृती : ओल्या नारळाचे तुकडे, जिरे आणि हिरव्या मिरच्या ग्राइंडरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करून घ्या. एका कढईत दोन कप पाणी घ्या. त्यात आंब्याचे तुकडे टाकून गॅसवर ठेवा. त्यात हळद, मीठ आणि बेसन घालून उकळून घ्या. पाच मिनिटांनी त्यात नारळाची पेस्ट घालून मिक्स करा. जेव्हा, ते उकळू लागेल, तेव्हा गॅसची आच कमी करा. त्यात फेटून घेतलेले दही घाला आणि दोन-तीन मिनिटांनी गॅस बंद करा. यानंतर एका फोडणी पात्रात तेल गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची आणि हिंग यांचा तडका तयार करून ताबडतोब दह्याच्या मिश्रणात घाला. गरमागरम भातासोबत दक्षिण भारतातील हा चविष्ट पदार्थ सर्व्ह करा.
• भाजलेले बेसन: ३ टीस्पून
• दही: २ कप
• नारळाचे दूध: १/२ कप
• फरसबी, गाजर, फ्लॉवर, शेवग्याच्या शेंगा, पालक, बटाटे आणि मशरूम (चिरलेले) २ कप
• हिरव्या मिरच्या मध्यभागी कापलेल्या: ३
• हळद: १/२ टीस्पून
• मीठ: चवीनुसार
• साखर: १ टीस्पून
• धणे पावडर: १ टीस्पून
• तेल: ४ चमचे
• जिरे : १/२ चमचा
• कलौंजी : १/४ चमचा
• हिंग : चिमूटभर
• लाल मिरची : २
• कढीपत्ता : ६
कृती : एका कढईत तीन चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात चिरलेल्या भाज्या घालून परतून घ्या. त्यात हळद, मीठ, धणे पूड, मिरची पूड घाला. भाज्या नव्वद टक्के शिजल्यावर त्यात हिरवी मिरची घाला. त्यात बेसन घालून परतून घ्या. बेसनातून सुगंध येऊ लागल्यावर गॅस कमी करून नारळाचे दूध घाला. याला उकळी येऊ द्या. यानंतर त्यात साखर घातल्यानंतर दही घालून चांगले मिक्स करून उकळून घ्यावे. दहीकढी चांगली शिजू द्या. दही घट्ट होऊ नये म्हणून सतत ढवळत राहा. गॅस बंद केल्यानंतर एका छोट्या पॅनमध्ये एक चमचा तेल घ्या. त्यात जिरे, कलौंजी. हिंग, लाल मिरची, कढीपत्ता हे फोडणीचे साहित्य घाला. कढीवर गरमागरम तडका घालून झाकून ठेवा. ही कढी भाताबरोबर सर्व्ह करा.
• टोमॅटो : ३
• भाजलेले बेसन: ३ टीस्पून
• दही: १ वाटी
• लाल तिखट: १ टीस्पून
• हळद: १/२ टीस्पून
• मीठ: चवीनुसार
• तेल: ३ टीस्पून
फोडणीसाठी:
• मोहरी: १/२ टीस्पून
• जिरे: १/२ टीस्पून
• कसुरी मेथी: १/२ टीस्पून
• हिंग: चिमूटभर
• कढीपत्ता : ४ ते ६ पाने
कृती : टोमॅटो धुवून प्युरी बनवून घ्या. एका कढईत दोन चमचे तेल घाला. टोमॅटो प्युरी नीट परतून घ्या. मिश्रणातून तेल निघू लागल्यावर त्यात भाजलेले बेसन घाला. बेसनाचा वास येईपर्यंत चांगले ढवळा. नंतर त्यात दोन कप पाणी घाला. आता मिश्रणात हळद, मीठ आणि मिरची पूड घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात फेटलेले दही घालून चांगले ढवळा. जेव्हा मिश्रण घट्ट होऊ लागेल आणि दही चांगले उकळेल, तेव्हा गॅस बंद करा आणि फोडणी घाला. ही कढी पोळीबरोबर किंवा गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करा.
संबंधित बातम्या