Dahi Handi 2024 Self Care Tips: दहीहंडीमध्ये मानवी मनोरे तयार करून हंडी फोडण्यासाठी उंच थर रचले जातात. यामुळे गोविंदांच्या पायाला खांद्याला, दुखापत किंवा डोक्याला दुखापत होऊ शकते. पण अनेकदा सुरक्षेच्या नियमाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यामुळे दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. मात्र, हा साहसी खेळ खेळत असताना आपणही स्वतःची विशेष काळजी घ्यायला हवी.
दहीहंडीत उंच मानवी मनोरे तयार करून हंडी फोडली जाते. यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. फ्रॅक्चर, डिस्लोकेशन, लिगामेंट टिअर आणि गंभीर प्रकरणांमध्ये पाठीच्या दुखापतींचा समावेश होतो ज्यामुळे दीर्घकालीन अपंगत्व येऊ शकते. या दरम्यान स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबईतील वरिष्ठ ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन प्रा.डॉ. धीरज सोनवणे यांनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत.
मणक्याची दुखापत: मणक्याची दुखापत ही उंचावरून खाली पडल्याने होते. यामुळे फ्रॅक्चर किंवा पाठीच्या कण्याला दुखापत होते, ज्यामुळे पक्षाघात किंवा इतर गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
फ्रॅक्चर आणि डिस्लोकेशन्स: उंचावरुन खाली पडल्याने किंवा मनगटावर येणाऱ्या अतिरिक्त ताणामुळे मनगट, घोटे आणि खांद्याचे फ्रॅक्चर आणि खांदा निखळण्याची शक्यता असते.
डोक्याला मार बसणे: हेल्मेटचा वापर न केल्यास डोक्याला गंभीर दुखापत होते, ज्यामध्ये डोक्याला मार हसणे किंवा मेंदूला गंभीर दुखापत होण्याचा धोका आहे.
लिगामेंट आणि टेंडन टीअर्स: सांध्यावरील ताण, विशेषत: गुडघे आणि घोट्यांवर येणाऱ्या ताणामुळे अस्थिबंधन फाटण्याचे शक्यता असते, जसे की ACL दुखापती. याकरिता विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
उपचारापेक्षा प्रतिबंध नेहमीच चांगला. दहीहंडी दरम्यान दुखापत होण्याचा धोका कमी करण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत:
> योग्य सुरक्षा साहित्याचा वापर:
हेल्मेट: सर्व सहभागींनी, विशेषत: मानवी मनोऱ्याच्या वरच्या स्थानावर असलेल्यांनी, डोक्याच्या दुखापतींपासून संरक्षण करण्यासाठी हेल्मेट घालावे.
सपोर्टिव्ह ब्रेसेस: घोट्याच्या आणि गुडघ्याच्या संरक्षणासाठी ब्रेसेस वापरल्याने अतिरिक्त आधार मिळू शकतो आणि अस्थिबंधनाच्या दुखापतींचा धोका कमी होतो.
> शारीरिक बळकटी:
स्ट्रेंथ ट्रेनिंग: नियमित प्रशिक्षण, हे मानवी मनोरे तयार करण्याच्या आणि ते टिकवून ठेवण्यास लागणारे शारीरीक बळ व स्थितरता मजबूत करते.
लवचिकता वाढवणारे व्यायाम: स्ट्रेचिंग आणि लवचिकता वाढवणारे व्यायामाचा समावेश केल्याने स्नायू आणि अस्थिबंधनाच्या दुखापतींचा धोका कमी होऊ शकतो.
बेस स्ट्रेंथ: पिरॅमिडचा पाया कोसळण्यापासून रोखण्यासाठी सर्वात मजबूत आणि सर्वात स्थिर सहभागींनी खालच्या थराला असल्याची खात्री करा.
उंचीचा विचार करा: थर जास्त उंच करणे टाळा. उंच थरावरुन पडल्यामुळे गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो.
> पर्यावरणीय घटक:
जमीनीवरील अडथळे दूर करा: तीक्ष्ण वस्तू किंवा असमान पृष्ठभागांसारख्या धोके तर नाहीत याची खात्री करा. थर रचण्याच जागा योग्य असावी.
हवामान: जर जमीन परिसर ओला किंवा निसरडा असेल, तर थर रचू नका. कारण, यामुळे पडण्याचा धोका वाढतो.
> प्रथमोपचार तयारी:
ऑन-साईट मेडिकल टीम: साईटवर प्रथमोपचार आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता असलेली वैद्यकीय टीम असणे महत्त्वाचे आहे.
इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅन: टकोणत्याही दुखापतींना त्वरीत आणि सुरक्षितपणे हाताळण्याकरिता अचुक योजना तयार करा.
दहीहंडी हा सामर्थ्य, चपळता आणि सामुदायिक भावना जपणारा उत्सव आहे. या आनंदावर विरजण पडणार नाही याची खात्री करण्यासाठी सुरक्षिततेला विशेष प्राधान्य द्या. या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून आणि जोखीम लक्षात घेऊन, दहीहंडी अशा प्रकारे साजरी करताना विशेष खबरदारी बाळगा.