Tips for making soft chapatis: स्वयंपाक करणे हीसुद्धा एक कलाच असते. त्यातल्या त्यात भाकरी आणि चपाती करणे अनेक स्त्रियांसाठी फारच कठीण असते. शिवाय अनेकांना चांगली चपाती करायला शिकण्यापेक्षा अवघड काही नाही असे वाटते. खासकरून भारतीय कुटुंबात, एखाद्या व्यक्तीची चपाती गोलाकार आणि मऊ होईपर्यंत चांगल्या स्वयंपाकीची पदवी त्यांना मिळत नाही. जेवणाच्या ताटात मऊ चपात्यांचे स्वतःचे वेगळे स्थान आहे. ताटातील डाळी-भाज्या कितीही रुचकर असल्या तरी चपाती वातड आणि बेचव झाली तर खाण्याची मज्जाच निघून जाते. बहुतांश लोकांना अनेक प्रयत्न करूनसुद्धा चपाती मऊ आणि लुसलुशीत करायला जमत नाही. त्यांच्याकडून नेमक्या कोणत्या चुका होतात किंवा कोणत्या गोष्टी करायला हव्यात आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
बहुतांश लोक पीठ मळताना कणिक जास्त पातळ म्हणून पाणी कमी वापरतात. परंतु कमी पाण्याने कणिकेमधील ओलावा कमी झाल्यामुळे चपात्या कडक होतात. तसेच, लाटताना जास्त कोरडे पीठ लावले तर त्यातील ओलाव्याच्या पातळीवर परिणाम होतो, त्यामुळे चपाती कोरडी होऊन थोड्याच वेळात कडक आणि वातड होऊ लागते.
चपाती जास्त काळ मऊ ठेवण्यासाठी, कणिक योग्य प्रमाणात पाण्याने मळून घेणे आवश्यक आहे. तसेच, पाणी घालण्यापूर्वी पीठ चाळणीतून चाळून घ्या. त्यामुळे पिठाचा घट्ट व खडबडीत भाग वेगळा होऊन चपात्या मऊ होतात. याशिवाय पीठ मळण्यासाठी तुम्ही दुध आणि पाणी मिक्स करूनसुद्धा वापरू शकता. गरम पाण्यात थोडे मीठ घालून कणिक मळून घेतल्याने चपात्या मऊ होतात. कारण त्यामुळे चपात्या चांगल्या फुगतात. जे जास्त काळ चपाती मऊ ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे.
जर तुम्हाला चपात्या बनवायला जास्त वेळ लागत असेल किंवा तुम्हाला त्रास होत असेल, तर ही ट्रिक एकदा वापरून पाहा. शेफ पंकजने या ट्रिकला 'दोस्ती की रोटी' असे नाव दिले आहे. यासाठी प्रथम पीठ मळून घ्या. आता दोन मध्यम आकाराचे गोळे बनवा. ते आपल्या हातांनी हलके दाबा. नंतर त्यावर थोडे तेल लावा. आता कोरडे पीठ लावा आणि त्यांना एकमेकांच्या वर ठेवून एकत्र लाटा. आता तवा गरम करून शेकून घ्या. चपात्या शेकल्या नंतर त्या आपोआप वेगळ्या होतात.