Bitter Gourd Cooking Tips In Marathi: मुले नेहमीच जेवताना विविध भाज्या खाताना टाळाटाळ करतात. त्यातल्या त्यात जर कारल्याची भाजी असेल तर मुलांसोबत मोठेही नाकं मुरडतात. कारला हा अत्यंत औषधीय गुणधर्म असणारा पदार्थ आहे. मात्र त्याच्या कडवटपणामुळे लोक त्याची भाजी खायला नकार देत असतात. पण जर कारल्याचा कडवटपणाच दूर झाला तर मोठ्यांसोबत मुलेही आवडीने ही औषधीय गुणधर्म असलेली भाजी खातील. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कारले खाल्ल्यानंतर ते अजिबात कडू वाटणार नाही.
आम्ही सांगितलेल्या पद्धतीने जर कारल्याची भाजी करून मुलांनी कारल्याचा आस्वाद घेतला तर ते नक्कीच खायला लागतील. आयुर्वेदानुसार, कारले हे नैसर्गिक रक्त शुद्ध करणारा पदार्थ आहे. कारले शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थित ठेवते. त्यात लोह, फायबर आणि अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत, ज्यामुळे कारल्याचा कडूपणा मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकतो.
-जर तुम्हीही कडू चवीमुळे कारल्याची भाजी खाण्यास टाळाटाळ करत असाल, तर तुम्ही तिची चव मीठाने बदलू शकता. कारले कापल्यानंतर त्यावर मीठ शिंपडा. १० ते १५ मिनिटे असेच राहू द्या. तुम्ही मीठ लावून कारले जितका जास्त वेळ ठेवाल तितकी त्याची चव नॉर्मल होईल. मीठ घातल्यावर त्यातील कडू पाणी बाहेर येईल, ते काढून टाका आणि नंतर कारले पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
-शेफ संजीव कपूर यांच्या ट्रिकनुसार, कारल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. या भाजीचे सेवन शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते. कडवटपणा दूर करण्यासाठी कारले कापून नारळाच्या पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवा. ३० मिनिटे ठेवल्यानंतर ते साध्या पाण्याने धुवून स्वच्छ करा.त्यामुळे बऱ्याच प्रमाणात कडवटपणा कमी होईल.
-कारल्याचा कडवटपणा दूर करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे, कारले कापून दह्यात टाका. साधारण तासभर ते तसेच राहू द्या. आता ते पाण्याने स्वच्छ करून भाजी तयार करा. त्याचा कडवटपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल.
-तसेच कारल्याचा कडूपणा कमी करायचा असेल, तर अर्धी वाटी कारली घ्या. त्यात एक कप पाणी आणि दोन चमचे साखर घाला. ते मिक्स करून त्यात चिरलेले कारले घाला. या पाण्यात कारले १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर त्या पाण्यातून काढून स्वच्छ पाण्यात धुवून त्याची भाजी करा. अशाने भाजी अजिबात कडू होणार नाही.