Constipation home remedies: पावसाळा जितका छान आणि सुंदर वाटतो, तितकाच तो त्रासदायकही ठरतो. कारण पावसाळ्यात आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात बद्धकोष्ठता जास्त त्रासदायक असते. पोटाच्या या दररोजच्या समस्येमुळे प्रचंड त्रास होतो. वास्तविक, जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा ते लहान आतड्यामध्ये पोहोचते. येथे अन्न बारीक करण्यासाठी यकृत आणि पोटातून अनेक एंजाइम आणि पाचक रसायने बाहेर पडतात. त्यांच्या मदतीने, अन्नातून आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. ज्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. परंतु, आपल्या आतड्यात खराब अन्नाचे पचन नीट होत नाही. त्यामुळे पोटात घाण जमा होऊ लागते. ही घाण अर्थातच मल जास्त वेळ पोटात राहिल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याची समस्याही वाढते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काही फळे अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
केळी हा भारतीय आहारात आवर्जून आढळणारा फळ आहे. हे फळ बाराही महिने उपलब्ध असते. केळी तोंडाची चव तर वाढवतेच पण ते अत्यंत औषधीय फळसुद्धा आहे. तज्ज्ञांच्या मते, केळीमध्ये प्रीबायोटिक फायबर असते जे आतड्यांतील फायदेशीर बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देते. हे बॅक्टेरिया पचनसंस्थेला निरोगी ठेवण्याची महत्वाची भूमिका बजावतात. ज्यामुळे मल शरीराबाहेर पडणे सोपे होते. आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. त्यामुळे आहारात केळीचा समावेश केल्यास उपयुक्त ठरते.
पपई हा अनेकांचा आवडता फळ आहे. खाण्यासाठी अत्यंत मऊ असलेला हा फळ, अनेक मोठ्या आजारांमध्ये फायदेशीर ठरतो. याशिवाय पपई पोटासाठीसुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता असल्यास पपईचे सेवन अवश्य करावे. यात पपेन नावाचे एंजाइम असते. जे पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते. दररोज नियमितपणे पपईचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
एका सफरचंदाच्या मदतीने आपण डॉक्टरचा खर्च वाचवू शकतो असे नेहमीच म्हटले जाते. कारण सफरचंद खायला जितके चविष्ट असते तितकेच ते आरोग्याला फायदेशीरसुद्धा असते. सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते. जे पचनावेळी आतड्याच्या हालचालींना चालना देण्यास मदत करते. यामध्ये पेक्टिन असते, जे आतड्याची हालचाल सुधारून बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करते. सफरचंद नेहमी त्याच्या सालीसोबत खावे. असे केल्यास तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल.
बद्धकोष्ठतेच्या बाबतीत, आपण आपल्या आहारात संत्र्याचा समावेश करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, संत्र्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने आतड्यांमध्ये साचलेली घाण अर्थातच मल बाहेर फेकण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, त्यात नॅरिन्जेनिन (फ्लॅव्होनॉइड) असते, जे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही आहारात संत्रीचा समावेश करू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)