Common Mistakes of Fasting: उपवास आरोग्यासाठी चांगला मानला जातो. असे म्हणतात की उपवास केल्याने स्वभाव बदलतो आणि पचनदेखील सुधारते. मात्र उपवास करताना काही लोक खाण्या-पिण्याशी संबंधित काही चुका करतात. ज्यामुळे एकूणच आरोग्याचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञ दीक्षा भावसार यांनी काही आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. उपवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा आणि काळजी घ्या.
उपवासाच्या काळात बहुतांश लोकांना दह्याबरोबर मिल्कशेक किंवा फळे खायला आवडतात. परंतु प्रत्यक्षात ते आपल्या आतड्याला हानी पोहोचवू शकते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये चरबी आणि प्रथिने जास्त असतात, जे फळांपेक्षा हळू हळू पचतात. फळांमध्ये असलेले आम्ल आणि एंझाइम्स केसिनसारख्या दुधातील प्रथिनांच्या पचनात अडथळा आणू शकतात. यामुळे फळांचे पचन होण्यास उशीर होऊ शकतो आणि आतड्यात गडबड होऊ शकते. ज्यामुळे गॅस आणि आतड्याचे आरोग्य बिघडू शकते. त्याऐवजी २ तासांच्या अंतराने डेअरीचे पदार्थ आणि फळे घ्या.
आयुर्वेदानुसार सूर्यास्तानंतर कच्चे पदार्थ पचण्यास अवघड असल्याने ते खाणे टाळावे. सलाद, न शिजवलेल्या भाज्या आणि फळे यासारख्या कच्च्या पदार्थांना भरपूर पचन ऊर्जेची आवश्यकता असते आणि रात्री सेवन केल्यास सूज येणे, अपचन आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. अशा वेळी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दिवसाच्या वेळी मेटाबॉलिझम जास्त असते त्या वेळी म्हणजेच १२ ते ४ च्या दरम्यान फळे/सलाद घ्या.
उपवासाच्या काळात चिप्स, पुरी इत्यादी तळलेले पदार्थ टाळावेत. कारण त्यात चरबीचे प्रमाण जास्त असते. जास्त तळलेले पदार्थ वजन वाढवू शकतात आणि हृदयाच्या आरोग्यास धोका वाढवू शकतात. त्याऐवजी, आपल्या अन्नातील चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी शिजवलेले किंवा भाजलेले पदार्थ निवडा.
उपवासादरम्यान जास्त साखर खाल्ल्याने अनहेल्दी वजन वाढू शकते, इन्सुलिन प्रतिरोध होऊ शकतो आणि दात लवकर किडतात. त्याऐवजी नैसर्गिक साखर असलेले पदार्थ खा. गूळ, मध कमी प्रमाणात खाणेही ठीक आहे.
उपवासाच्या वेळी असे होऊ शकते की आपण आपल्या भुकेबद्दल अतिजागरूक असाल आणि तहानला भूक मानून पुन्हा पुन्हा खात असाल. त्याऐवजी, लालसा दूर ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या आणि दिवसातून दोन-तीन वेळा हर्बल टी प्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)