Who Should Not Use Coconut Oil: तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना हे सांगताना ऐकले असेलच की, जर हवामान बदलत असेल आणि त्वचेचा कोरडेपणा वाढत असेल तर कोणताही विचार न करता त्वचेला खोबरेल तेल लावा. हे एक नैसर्गिक तेल आहे. जे सुकलेल्या नारळाचा वापर करून तयार केले जाते. अशा परिस्थितीत बरेच लोक मॉइश्चरायझरऐवजी खोबरेल तेलाचा वापर करतात. या तेलाचा वापर आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. परंतु खूप कमी लोकांना माहित आहे की, याच्या वापरामुळे त्वचेला हानीदेखील होऊ शकते.
खोबरेल तेल अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु हे तेल सरसकट सर्वांनीच वापरू नये. काही लोकांनी हे तेल त्वचेवर लावणे टाळावे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही तुमच्या त्वचेवर खोबरेल तेल वापरल्यास ते हानिकारक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी खोबरेल तेल वापरू नये याबाबत सांगणार आहोत.
विविध ऋतूंमध्ये आपण खोबरेल तेलाचा मॉईश्चराइझर म्हणून वापर करतो. परंतु तुमच्या त्वचेवर आधीच पुरळ येत असल्यास, खोबरेल तेल लावल्याने समस्या वाढू शकते. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्र बंद होऊ शकतात. अशा परिस्थितीत खोबरेल तेल अजिबात वापरू नका.
जर तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर तुम्ही खोबरेल तेल वापरणे टाळावे. खोबरेल तेल कॉमेडोजेनिक आहे. म्हणजेच हे तेल तुमच्या त्वचेचे छिद्र बंद करू शकते. त्यामुळे पुरळ येण्याची शक्यता वाढते. अशा स्थितीत तुम्ही खोबरेल तेल चेहऱ्यासाठी न वापरलेलेच उत्तम.
बऱ्याच लोकांना त्वचेची ॲलर्जी खूप लवकर होते. अशा परिस्थितीत या लोकांनी खोबरेल तेल वापरणे टाळावे. पॅच टेस्टशिवाय याचा वापर केल्याने खाज सुटणे, लालसरपणा, जळजळ किंवा सूज येऊ शकते. ॲलर्जीचा संशय असल्यास, पॅच टेस्ट करणे चांगले. पॅच टेस्टमध्ये जर तुम्हाला कोणताही त्रास झाला नाही तर तुम्ही योग्य प्रमाणात तेल वापरू शकता. पण शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरलेले योग्य असते.
वरील गोष्टींवरून हे स्पष्ट होते की, खोबरेल तेलाचा वापर प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी योग्य नाही. विशेषत: तेलकट किंवा संवेदनशील त्वचा असलेल्यांना यामुळे समस्या उद्भवू शकतात. म्हणून, खोबरेल तेल वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. आणि आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या गरजेनुसार ते योग्यरित्या वापरले जात आहे याची खात्री आपण केली पाहिजे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)