Cleaning Tips: पाण्याच्या फिल्टरमध्ये साचलाय काळा किंवा पिवळा थर? स्वयंपाक घरातील 'या' वस्तू वापरून मिनिटात करा साफ
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Cleaning Tips: पाण्याच्या फिल्टरमध्ये साचलाय काळा किंवा पिवळा थर? स्वयंपाक घरातील 'या' वस्तू वापरून मिनिटात करा साफ

Cleaning Tips: पाण्याच्या फिल्टरमध्ये साचलाय काळा किंवा पिवळा थर? स्वयंपाक घरातील 'या' वस्तू वापरून मिनिटात करा साफ

Published Jul 28, 2024 02:52 PM IST

Tips for Cleaning Water Filter: अनेकजण आपल्या घरात वॉटर फिल्टर बसवतात. मात्र, काही दिवसांच्या वापरानंतर फिल्टरमध्येच गाळ जमा होऊ लागते. त्यामध्ये काळा किंवा पिवळा थर साचतो.

वॉटर फिल्टर साफ करण्याचे सोपे उपाय
वॉटर फिल्टर साफ करण्याचे सोपे उपाय (Shutterstock)

Tips for Cleaning Water Filter: पाण्यातील प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की, आज थेट नळातून किंवा टाकीतून पाणी पिणे म्हणजे आरोग्याशी तडजोड करण्यासारखे आहे. त्यामुळे हल्ली जवळजवळ सगळेच पाण्यासाठी फिल्टर वापरतात. अनेकजण आपल्या घरात वॉटर फिल्टर बसवतात. मात्र, काही दिवसांच्या वापरानंतर फिल्टरमध्येच गाळ जमा होऊ लागते. त्यामध्ये काळा किंवा पिवळा थर साचतो. अशा वेळी पाणी नीट फिल्टर होत नाही. शिवाय त्यातून वासही येऊ लागतो. अशावेळी ते स्वच्छ करण्यासाठी फिल्टर मेंटेनन्सवाल्यांना बोलवावे लागते. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टींच्या मदतीने वॉटर फिल्टर साफ करण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत. चला तर मग बघूया ते उपाय कोणते आहेत.

व्हिनेगरचा वापर

व्हिनेगरचा वापर बऱ्याच सफाई हॅक्समध्ये केला जातो. घरातील वॉटर फिल्टरमध्ये साचलेली घाणही व्हिनेगरच्या साहाय्याने साफ करता येते. यासाठी सर्वप्रथम गरम पाणी आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळावे. त्यानंतर तुमचे फिल्टर काढून या पाण्यात बुडवा. साधारण १ तासानंतर मऊ ब्रशच्या साहाय्याने फिल्टरवर साचलेली घाण हलक्या हातांनी चोळून स्वच्छ करावी. अशाने फिल्टर पूर्णपणे स्वच्छ होईल. त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने ते धुवून वापरायला घ्या.

लिंबूचा रस

लिंबाच्या रसात आढळणारे आम्ल जंतूंना मुळापासून नष्ट करण्यास उपयोगी ठरतात. यासोबतच घाण आणि दुर्गंधीही दूर होते. लिंबाच्या रसाने वॉटर फिल्टर स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम पाण्यात लिंबाचा रस घाला. लक्षात ठेवा की जितके पाणी आहे तितकाच लिंबाचा रस असावा. आता तुमचे फिल्टर तयार मिश्रणात सुमारे अर्धा तास बुडवून ठेवा. यानंतर एका मऊ ब्रश किंवा मऊ कापडाच्या साहाय्याने घासून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. अशा प्रकारे फिल्टरवर साचलेली घाण पूर्णपणे साफ होईल.

बेकिंग सोडा

फिल्टर स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडादेखील वापरला जाऊ शकतो. बेकिंग सोड्यापासून फिल्टर स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम पाण्यात बेकिंग सोडा मिसळून जाडसर पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट फिल्टरवर पातळ थरात लावा. यानंतर फिल्टरवर साचलेली घाण ब्रशने चोळून स्वच्छ करावी. शेवटी कोमट पाण्याच्या साहाय्याने फिल्टर धुवून स्वच्छ करा. अशाप्रकारे तुमच्या फिल्टरवरील काळा-पिवळा थर निघून जाईल.

मिठाचा वापर

वॉटर फिल्टर स्वच्छ करण्यासाठी मीठाचादेखील वापर केला जाऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम अर्धा कप मीठ घेऊन साधारण एक कप व्हिनेगरमध्ये मिसळून जाड पेस्ट तयार करावी. आता ही पेस्ट फिल्टरवर लावा आणि १ तास तसेच ठेवा. १ तासानंतर फिल्टरवर साचलेली घाण हलक्या हातांनी चोळून मऊ ब्रशने स्वच्छ करावी. आता कोमट पाण्याने फिल्टर नीट स्वच्छ करा.

 

Whats_app_banner