Home Cleaning Tips In Marathi: आपलं स्वतःच सुंदर असं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सर्वजणच आपल्या घरात विविध सजावटी करत असतात. परंतु घर सुंदर आणि स्वच्छ दिसण्यासाठी घराच्या भिंती स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे. कितीही साफसफाई, सजावट केली तरी भिंती घाण असतील तर लोकांचं पहिलं लक्ष भिंतीकडे जातं. म्हणूनच एखाद्या खासप्रसंगी घराची रंगरंगोटी नक्कीच केली जाते. पण काही दिवस रंगरंगोटी केल्यानंतर एकतर घरातील मुले किंवा कधी कधी घरातील वरिष्ठही नकळत भिंतीवर डाग पाडून भीती घाण करतात. अशात भिंतींचा रंग फिकट असेल तर भिंती अधिक कुरूप दिसतात. आता प्रत्येक वेळी रंगरंगोटी करणे शक्य होत नाही. त्यामुळेच आज आपण जाणून घेणार आहोत या भिंती कशा स्वच्छ कराव्यात.
अनेकदा भिंतींवर हाताचे ठसे उठवले जातात किंवा पेंटिंगचा रंग लावला जातो. जो पांढऱ्या भिंतींवर दिसायला अतिशय घाणेरडा दिसतो. भिंतींवरील असे डाग साफ करण्यासाठी डिशवॉश लिक्विडचा वापर करता येतो. यासाठी एका भांड्यात डिशवॉश लिक्विड घेऊन थोडे पाणी मिसळावे. नंतर त्यात स्पंज बुडवून हलकेच पिळून घ्यावे आणि त्याच्या मदतीने भिंतीवरील डाग हलक्या हातांनी चोळून स्वच्छ करावे. डाग स्वच्छ झाल्यावर ओल्या कापडाने भिंत नीट पुसून घ्या. अशा प्रकारे भिंती स्वच्छही होतील चमकतीलसुद्धा.
ज्या घरात शाळेत जाणारी मुले असतात त्या घरात अनेकदा भिंतींवर शाईचे किंवा रंगाचे डाग दिसतातच. हे डाग साफ करण्यासाठी अल्कोहोल रबिंगचा वापर केला जाऊ शकतो. रबिंग अल्कोहोलने भिंतीवरील डाग साफ करण्यासाठी प्रथम स्पंज किंवा सुती कापड अल्कोहोलमध्ये बुडवा आणि नंतर हलक्या हाताने घासून भिंतीवरील डाग स्वच्छ करा. डाग पूर्णपणे काढून टाकल्यावर, भिंत ओल्या कापडाच्या मदतीने पूर्णपणे पुसून टाका. अशाप्रक्रारे अगदी चिवट डागसुद्धा दूर होऊन घर सुंदर दिसेल.
घरामध्ये असे अनेक पदार्थ असतात जे आपले घर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळेच भिंतीवरील घाणेरडे डाग काढून टाकण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडादेखील वापरला जाऊ शकतो. स्वयंपाकघरातील भिंतींवर तेलाचे डाग काढून टाकण्यासाठी हे मिश्रण विशेषतः प्रभावी आहे. डाग काढून टाकण्यासाठी, प्रथम डाग असलेल्या भागावर बेकिंग सोडा शिंपडा. आता एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात समान प्रमाणात व्हिनेगर घाला. आता तयार मिश्रणात स्पंज बुडवून घासून डाग साफ करा. डाग पूर्णपणे साफ झाल्यावर, भिंती ओल्या कापडाने पुसून टाका. अशा प्रकारे, भिंतींवरील तेलाचे चिवट डाग सहजपणे काढले जातील.
संबंधित बातम्या