How to clean brass utensils: घर म्हटलं की भांडी ही आलीच. अनेक वेगवेगळ्या धातूंनी बनवलेली भांडी घरांमध्ये वापरली जातात. काही लोकांना स्वयंपाकघरात स्टीलची भांडी ठेवायला आवडतात. तर दुसरीकडे फॅशन ट्रेंड फॉलो करणारे बहुतेक लोक त्यांच्या घरात काचेची भांडी वापरण्याला प्राधान्य देतात. महत्वाचं म्हणजे घरातील देवघरात दिवे, मूर्ती आणि काही विशेष भांड्यांसाठी पितळेचा वापर सर्वोत्तम मानला जातो. परंतु पितळेच्या वस्तूदेखील अनेकदा काळ्या होतात. अशा परिस्थितीत, या पवित्र गोष्टींना पुन्हा नव्यासारखं चमकवण्यासाठी आणि त्यांची स्वच्छता करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. आज आम्ही याच उपायांबाबत तुम्हाला सांगणार आहोत.
तसं पाहायला गेल्यास, पितळेची चमक सोन्यापेक्षा कमी नसते. परंतु, बहुतांश वेळा सतत वापर केल्याने पितळ काळे पडू लागते. अनेकदा घासूनही पितळ पुन्हा चमकणे जवळजवळ अशक्य वाटते. म्हणूनच आम्ही तुम्हाला पितळेच्या वस्तू स्वच्छ करण्याचे काही सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही मंदिरातील दिवा, पितळी मूर्ती आणि पितळेची भांडी काही मिनिटांत चमकवू शकता. या घरगुती टिप्स एकदा फॉलो केल्यास परत कधीच पितळेच्या भांड्यांची चिंता वाटणार नाही.
लिंबाचा रस आणि मीठदेखील पितळ साफ करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी १ चमचे मिठात लिंबाचा रस मिसळून पितळेवर काही वेळ चोळा. यानंतर पितळेची भांडी आणि मूर्ती गरम पाण्याने धुवा. अशाप्रकारे पितळेवर आलेला काळेपणा दूर होऊन ते पुन्हा नव्यासारखे चमकू लागतील.
पितळेचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचीही मदत घेऊ शकता. यासाठी पितळेच्या वस्तूंवर व्हिनेगर लावा. आता मीठ घासून गरम पाण्याने धुतल्यानंतर पितळेचा काळेपणा सहज नाहीसा होईल. पितळेच्या भांड्यांना चमकवण्यासाठी हा उपाय उत्तम आहे.
पितळेच्या वस्तू चमकवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा घ्या. नंतर त्यात लिंबाचा रस घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट पितळी मूर्ती, दिवा आणि भांड्यांवर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. त्यानंतर या गोष्टी गरम पाण्याने स्वच्छ करा. या वस्तूंवर पुन्हा नव्यासारखी चमक दिसू लागेल.
पितळेची भांडी आणि देवाच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी रॉक सॉल्ट, मैदा आणि व्हिनेगर देखील वापरला जाऊ शकतो. तिन्ही वस्तू समान प्रमाणात घेऊन त्याची पेस्ट बनवा आणि त्याने या गोष्टी स्वच्छ करा, यामुळे मूर्तीवर जमा झालेला काळेपणा दूर होईल.