Christmas Meaning In Marathi : थंडीचा महिना सुरू झाला की, अनेक ठिकाणी बर्फाच्या चादरी दिसू लागतात. मात्र, काही ठिकाणी केवळ गुलाबी हवा सगळ्यांना मोहवून टाकत असते. थंडीचा ऋतु सुरू झाला की, नवीन वर्षाच्या स्वागताची आणि या दरम्यान येणाऱ्या ख्रिसमस या सणाची लगबग सुरू होते. जगभरातील ख्रिस्ती बांधव या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. या दरम्यान त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण, सुंदर डेकोरेशन आणि केकसह गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. सगळ्यांनाच या सणाची उत्सुकता सगळ्यांनाच असते. मात्र, 'ख्रिसमस' म्हणजे काय? या शब्दाचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे...
ख्रिसमस हा शब्द आणि त्याचा सण ख्रिश्चन धर्माच्या इतिहासाशी संबंधित आहे. 'ख्रिसमस' या शब्दाचा उगम इंग्रजी शब्द 'Christ's Mass'पासून झाला आहे, जो येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवशी होणाऱ्या धार्मिक समारंभाच्या संदर्भात वापरला जातो. 'ख्रिस्त' म्हणजे येशू ख्रिस्त, ज्याला ख्रिश्चन धर्मामध्ये ईश्वराचा पुत्र मानले जाते. तर, 'मस' हा शब्द 'मिस्सा' या शब्दापासून निर्माण झाला आहे, ज्याचा अर्थ धार्मिक पूजा असा असतो. 'ख्रिसमस' म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या निमित्ताने आयोजित केलेला धार्मिक समारंभ अर्थात येशूच्या जन्माचा उत्सव असा आहे.
ख्रिसमस सणाची सुरुवात ख्रिश्चन धर्माच्या आद्य काळात झाली. येशू ख्रिस्ताचा जन्म २५ डिसेंबरला झाला असल्याचे ख्रिश्चन धर्मगुरू मानतात. मात्र, येशूच्या जन्माची खरी तारीख अद्याप कुठेही नोंद असल्याचे आढळून आलेले नाही. बायबलमध्ये देखील या विशिष्ट तारखेचा कोणताही उल्लेख नाही. तरीही, चौथ्या शतकाच्या सुरुवातीस रोममध्ये २५ डिसेंबरला येशूचा जन्म सोहळा साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. सर्वप्रथम, ख्रिसमस सण इ.स. ३३५मध्ये रोममध्ये साजरा करण्यात आला. रोमचा सम्राट कॉन्स्टंटाइन याच्या काळात ख्रिस्ती धर्म अधिकृत झाला आणि येशूच्या जन्माचा सोहळा साजरा करणासाठी २५ डिसेंबर हा दिवस एक पवित्र दिन म्हणून ठरवण्यात आला. नंतर अनेक वर्षांच्या कालखंडात ख्रिसमस सणामुळे कॅथोलिक, प्रोटेस्टंट, आणि इतर ख्रिश्चन समुदायांमध्ये विविध परंपरा आणि उत्सव तयार झाले.
ख्रिसमस सणाला एक धार्मिक महत्त्व असले तरी, त्याचा सांस्कृतिक प्रभाव जगभरात पसरला आहे. ख्रिसमसच्या काळात अनेक लोक आपल्या कुटुंबासोबत एकत्र येऊन आनंद साजरा करतात, शांती आणि प्रेमाचा संदेश देतात.
संबंधित बातम्या