Children's eye health: सध्याच्या काळात लाईफस्टाईलमध्ये प्रचंड बदल झाला आहे. बदलत्या काळानुसार लहान मुलांच्यातदेखील विविध बदल घडून येत आहेत. अलीकडे मुलांमध्ये डोळ्यांशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. बहुतांश मुलांना अंधूक दिसणे आणि चष्मा घालण्याची गरज वाटणे यासारख्या डोळ्यांच्या समस्या लहान वयातच अगदी सामान्य झाल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांशी संबंधित या समस्यांसाठी लाईफस्टाईलशी निगडित अनेक कारणे जबाबदार असू शकतात. शरीरातील पोषणाच्या कमतरतेपासून मुलांच्या स्क्रीन टाइममध्ये वाढ होण्यापर्यंत मायोपियासारख्या गंभीर समस्या वाढत आहेत.
वास्तविक डोळ्यांची दृष्टी कमकुवत होणे आणि डोळ्यांना त्रास होणे, ही समस्या वाढत्या वयात उद्भवणारी समस्या मानली जाते. मात्र, अलीकडच्या काळात वरिष्ठांसोबत लहान मुलांमध्ये या समस्या झपाट्याने वाढत असल्याचे अभ्यासावरून दिसून येते. नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, १० वर्षांखालील लहान मुलांना मोठ्या संख्येने मायोपिया किंवा दूरदृष्टी असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये दूरच्या वस्तू पाहण्यास अडचण येते, त्यासाठी चष्मा वापरावा लागतो. लहान वयात या समस्या येत असल्याने ही अत्यंत चिंतेची बाब मानली जात आहे.
मुलांच्या डोळ्यांच्या वाढत्या समस्यांबद्दल जाणून घेण्यासाठी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या समस्या मुख्यत्वे ६ ते १४ वर्षांच्या वयात सुरू होतात. या समस्येची वेळीच काळजी न घेतल्यास गंभीर परिस्थितीत मायोपिक मॅक्युलोपॅथी, रेटिनल डिटेचमेंट, काचबिंदू आणि मोतीबिंदू यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, अंदाजे ९ टक्के शालेय वयातील मुले आणि ३० टक्के किशोर वयातील मुलांना मायोपिया उद्भवू शकतो. जर या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास किंवा त्याकडे दुर्लक्ष गेल्यास तुमच्या मुलां दृष्टी जाऊन त्यांना आंधळेपणा येऊ शकतो. त्यामुळे या आजाराकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
बदलत्या लाइफस्टाइलमुळे मुलांच्या करमणुकीच्या पद्धतीसुद्धा बदलल्या आहेत. आजकालची मुले अगदी लहान वयातच मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर यांसारख्या उपकरणांच्या संपर्कात येत आहेत. फक्त संपर्कच नव्हे तर मुले तासंतास याच उपकरणासोबत घालवत आहेत. नेत्र तज्ज्ञांच्या मते, स्मार्ट डिव्हाइस स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने मायोपियाचा धोका ३० टक्क्यांनी वाढतो. यासोबतच संगणकाच्या अतिवापरामुळे हा धोका जवळपास ८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळेच तुमची मुलेसुद्धा टीव्ही, कॉप्म्युटर, लॅपटॉप, मोबाईल अशा स्मार्ट गॅझेटवर जास्त वेळ घालवत असतील. तर तुम्हाला वेळीच सतर्क होण्याची गरज आहे.
नेत्र तज्ज्ञ सांगतात की, लाइफस्टाईलमध्ये काही गोष्टींची काळजी घेतल्यास मायोपियाचा धोका कमी करता येऊ शकतो. यासाठी पालकांना पुढाकार घेण्याची गरज आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमचे मूल जास्त वेळ पडद्यापासून दूर राहून, बाहेर जाऊन खेळावे यासाठी युक्ती करा. संगणक किंवा इतर डिजिटल उपकरणांवर स्क्रीन टाइम मर्यादित करा. तसेच मुलांचा आहार पौष्टिक ठेवणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन ए आणि ई सह बीटा कॅरोटीन असलेले पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी आणि चांगली दृष्टी राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)