what causes chikungunya: पावसाळा हा ऋतू जितका सुंदर आणि हवाहवासा वाटणार असतो. तितकाच तो त्रासदायकसुद्धा ठरतो. पावसाळयात विविध आजारांचा प्रादुर्भाव सुरु होतो. अनेक साथीचे आजार याकाळात वेगाने पसरतात. गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, झिका व्हायरस पसरल्याचं आपण ऐकलं होतं. दरम्यान आता चिकनगुनियासारख्या आजाराने डोकं वर काढलं आहे. देशभरात या आजाराचे रुग्ण पाहायला मिळत आहेत. चिकुनगुनिया ताप हा देखील डेंग्यूप्रमाणेच डासांमुळे होणाऱ्या आजारांपैकी एक आहे. चिकुनगुनिया हा एक असा आजार आहे जो काही दिवसात बरा होतो, पण त्याचा प्रभाव एक-दोन महिने नाही तर अनेक वर्षे टिकतो. या आजारादरम्यान हाडांना झालेली दुखापत अनेक दिवस बरी होत नाही. अशा परिस्थितीत, त्याचे संरक्षण करणे आणि आवश्यक काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आज आपण या आजाराशी संबंधित लक्षणे आणि उपाय पाहणार आहोत.
चिकनगुनिया हा डासांमुळे पसरणारा आजार आहे. खासकरून हा आजार पावसाळ्यात वेगाने पसरतो. या आजाराच्या लक्षणांबाबत सांगायचे झालं तर, साधारणपणे, या आजारामध्ये प्रचंड सांधेदुखी होते. शिवाय अचानक ताप येणे आणि अंग थरथरणे असे लक्षण दिसून येतात. याशिवाय रुग्णाला स्नायू दुखणे, थकवा आणि मळमळ, डोकेदुखी, अंगावर पुरळ येण्याची तक्रार असते. चिकुनगुनियाचा ताप बरा झाल्यानंतरही सांदेदुखीचा त्रास अनेक वर्ष तसाच राहतो. ही लक्षणे तुमच्यात किंवा जवळच्या व्यक्तींच्यात दिसल्यास लगेच सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या.
चिकनगुनियाबाबत सांगायचे झाले तर, पावसाळ्यात विषाणू संक्रमित डासांच्या चाव्यामुळे हा आजार पसरतो. चिकुनगुनियाच्या विषाणूने त्रस्त असलेल्या व्यक्तीला चावल्याने डासांचा संसर्ग होतो आणि हा आजार पसरतच राहतो. चिकुनगुनिया व्हायरस हा 'सायलेंट' संसर्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो आपल्या आजूबाजूची जागा, पाण्याच्या टाक्या स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घ्या.
- डासांच्या ठिकाणी कीटकनाशक उत्पादने वापरा.
-त्वचेवर निलगिरी किंवा लिंबू तेल लावा.
- डास होणार नाहीत यासाठी स्वच्छता ठेवा.
- शरीर पूर्णपणे झाकले जाईल असेच कपडे घाला. जेणेकरुन डास चावणार नाहीत.
- घराच्या आतमध्ये डास येऊ नयेत यासाठी खिडक्या आणि दारांवर काही व्यवस्था करा.
-घरामध्ये कोणत्याही प्रकरचे रोप लावले असेल तर त्या कुंडीत पाणी साचू देऊ नका. अथवा डास होण्याची शक्यता असते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)