Methi Murgh Recipe: जर तुम्ही चिकनचे शौकीन असाल तर वीकेंडला लंच किंवा डिनरसाठी मेथी मुर्गची रेसिपी नक्की ट्राय करून पाहा. ज्यांना चिकन आवडते त्यांना ही रेसिपी खूप चवदार वाटते. मेथी घालून बनवलेले हे चिकन खायला खूप चविष्ट आहे. हे तुम्ही नान, रोटी किंवा भातासोबत सर्व्ह करू शकता. या चिकन रेसिपीमध्ये मेथीचा सुगंध वेगळीच चव देतो. चला तर मग वाट कसली पागताय जाणून घेऊया मेथी मुर्ग कसा बनवायचा.
- ४५० ग्रॅम चिकन ब्रेस्टचे बोनलेस तुकडे
- २२० ग्रॅम ताजी मेथी
- १२५ ग्रॅम दही
- ६० ग्रॅम कांदा बारीक चिरलेला
- २० ग्रॅम लसूण बारीक चिरून
- ५ ग्रॅम आले बारीक चिरून
- २ मध्यम हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- २ चमचे लिंबाचा रस
- १ चमचा पांढरी मिरची
- ५ ग्रॅम आले पेस्ट
- १० ग्रॅम लसूण पेस्ट
- ३ ग्रॅम काळी मिरी
- ५ टेबलस्पून मोहरीचे तेल
- १ टीस्पून जिरे
- चिमूटभर काळी वेलची पावडर
- चिमूटभर दालचिनी पावडर
- २० ग्रॅम कोथिंबीर बारीक चिरलेले
- १ टीस्पून लिंबाचा रस
- १ इंच आल्याचा तुकडा
- मीठ चवीनुसार
मेथी मुर्ग बनवण्यासाठी सर्वप्रथम चिकन धुऊन झाल्यावर त्याचे पाणी वेगळे करण्यासाठी भांड्यात ठेवा. त्यात मॅरीनेशन मसाले घालून चांगले मिक्स करून बाजूला ठेवा. आता ताजी मेथी कापून त्यावर मीठ शिंपडा आणि मिक्स करा. यानंतर वाहत्या पाण्यात ५ मिनिटे मेथी धुवा म्हणजे सर्व मीठ निघून जाईल. असे केल्याने मेथीचा कडूपणा निघून जातो. मेथी धुवून बाजूला ठेवा. आता कढईत मोहरीचे तेल घालून गरम करा. गॅसची फ्लेम हाय ठेवा. जेव्हा तेलातून धूर निघू लागतो तेव्हा फ्लेम कमी करा आणि जसजसा धूर कमी होईल तसतसे तेलाचे तापमान मध्यम होऊ द्या. आता त्यात जिरे टाका. नंतर त्यात लसूण टाका आणि गोल्डन ब्राऊन होऊ द्या. त्यात कांदा घालून मध्यम आचेवर सोनेरी रंगाचा होईपर्यंत परता. आता त्यात मेथी घाला आणि सतत ढवळत असताना भाजून घ्या. कडांना तेल दिसेपर्यंत हे नीट भाजा. यानंतर आले, हिरवी मिरची आणि दही घालून तेल वेगळे होईपर्यंत परतून घ्या. त्यात चिकन घालून गॅस वाढवा आणि २ ते ३ मिनिटे शिजवा.
तेल वेगळे होईपर्यंत चिकन मध्यम आचेवर शिजवा. यानंतर त्यात वेलची आणि दालचिनी, कोथिंबीर, लिंबाचा रस घालून चिकन आणखी काही वेळ शिजवून घ्या. आता एका सर्व्हिंग बाऊलमध्ये चिकन काढून चिरलेले आले आणि फ्रेश क्रीमने गार्निश करून सर्व्ह करा.