सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात परकीय भाषा शिकणे या पूर्वी कधी नव्हते इतके महत्त्वाचे झाले आहे. जगात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा अवगत केल्याने तुम्हाला व्यवसाय, संस्कृती आणि राजकारणात अनेक संधी उपलब्ध होतात. यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण सुलभ करण्यात आणि करिअरच्या संधींमध्ये वाढ करण्यात मदत होते. जर्मन, फ्रेंच, जपानी, स्पॅनिश, मँडरीन यांपैकी कोणत्याही भाषेचे ज्ञान असल्यास ती भविष्यासाठी एक मौल्यवान गुंतवणूक ठरते.
भारतीयांसाठी बहुभाषिक असण्याची संकल्पना नवीन नाही. खरेतर आपल्यापैकी बहुतेकजण बहुभाषिक नसले तरी द्विभाषिक नक्कीच असतात. जागतिकीकरणाची पोहोच वाढल्यामुळे, इंग्रजी, जी एकेकाळी आपल्यासाठी परकीय भाषा होती, ती आता एक जवळपास रोजच्या वापरातली भाषा बनली आहे. सध्याच्या ‘बबलोनॉमिक्स’च्या जगात जर्मन, फ्रेंच, जपानी, स्पॅनिश, मँडरीन या परदेशी भाषा शिकल्याने उद्योग-व्यवसायाच्या कोणत्याही क्षेत्रात त्याचा अधिक फायदा होऊ लागला आहे.
चीनचे वाढते आर्थिक सामर्थ्य आणि कौशल्य शिकलेल्यांची होत असलेली अधिकाधिक मागणी यामुळे चीनमध्ये बोलली जाणारी मँडरीन भाषा शिकण्याकडे तरुणांचा कल वाढतो आहे. अनुभवी चिनी दुभाष्याला सरासरी वार्षिक वेतन सुमारे १० ते १२ लाख इतके मिळते. जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीत चीन प्रमुख भूमिका निभावत असल्यामुळे मँडरीन भाषेत प्राविण्य मिळविले असल्यास व्यापार, वित्त आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
स्पॅनिश ही जगात दुसरी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणून गणली जाते. अमेरिकेत टेक्सास, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया सारख्या राज्यांत स्पॅनिश मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. तेथे हिस्पॅनिक भाषिकांची लोकसंख्या मोठ्या संख्येने असल्याने स्पॅनिश भाषा अवगत असल्यास यूएसला जाण्याची योजना आखत असलेल्या विद्यार्थ्यांना लाभ होऊ शकतो. स्पॅनिश शिकलेल्यांना यामुळे अभ्यास करत असताना अर्धवेळ नोकऱ्या सहज मिळू शकतात. त्याचप्रमाणे स्पॅनिश शिकलेल्यांना तेथे आरोग्यसेवा आणि शिक्षण सारख्या क्षेत्रांमध्ये पूर्णवेळ नोकऱ्याही मिळू शकतात. स्पॅनिश आणि फ्रेंच भाषा तज्ञांना भारतातही शैक्षणिक क्षेत्र (आय.बी., आय.जी.सी.एस.ई. बोर्डाच्या शाळा) आणि कॉल सेंटरच्या नोकऱ्यांमध्ये सर्वात जास्त मागणी असते.
जपानच्या टोयोटा, सोनी आणि मित्सुबिशीसारख्या कंपन्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा विस्तार झालेला आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पात जपानी कंपन्या आणि जे.आय.सी.ए. सारख्या संस्थांचा लक्षणीय सहभाग आहे. भारतातील अनेकांना, विशेषत: ज्यांना जपानी भाषा लिहिता/बोलता येते, त्यांना या प्रकल्पात तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या आहेत. भारतात जपानी भाषा तज्ञांना किमान वर्षाला ८ ते १२ लाख रुपये वेतन मिळते. जपानी भाषा शिकलेल्या आणि अनुभव असलेल्यांना त्याहून अधिक वेतन मिळते.
हे वाचाः करिअरच्या विविध वाटांबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग आणि गणित या विषयांत पदवी असेल्या आणि सोबत जर्मन भाषा येणाऱ्यास सामान्यत: ६ ते ९ लाख एवढे प्रतिवर्ष वेतन मिळते. जर्मनी ही तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीची भूमी असल्याने आणि युरोपिअन युनिअन मधील भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार असल्याने नोकरी शोधणाऱ्यांना तसेच जर्मनीमध्ये जाऊन शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर्मन या भाषेत प्रावीण्य असणे महत्वपूर्ण आणि फायदेशीर आहे.
भारतात फ्रेंच भाषेचा विस्तार हा त्या भाषेतली अत्याधुनिकता, संवेदनशीलता आणि अध्यापनशास्त्रीय महत्त्व यापलीकडे आहे. भारत आणि फ्रान्सदरम्यान संरक्षण, हवामान बदल आणि व्यापार क्षेत्रात मोठी देवाणघेवाण होत असते. त्यामुळे फ्रेंच भाषेचे महत्व अर्थव्यवस्थेच्या द्विपक्षीय व्यापाराशी जुडलेले आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यामधील या सामायिक दृष्टीमुळे फ्रेंच भाषा शिकण्याचे फार महत्त्व आहे.
भाषा शिकणे हे शैक्षणिक निकड किंवा छंद म्हणून घेतलेलं शिक्षण अशा दोन्ही प्रकारे तुम्ही शिकू शकता. सोशल मीडियामुळे परकीय भाषा शिकण्यासाठी अनेक जण प्रवृत्त होत असल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे के-पॉप आणि के-ड्रामाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कोरियन भाषा तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.
भारत आणि रशिया यांच्यातील राजकीय संबंधांमुळे रशियन भाषा शिकलेल्यांची मोठी मागणी असते. सध्याच्या जगात परदेशी भाषा शिकणे हे केवळ संवादाचे साधन नसून ते संधींचे प्रवेशद्वार होत आहे.
(जिगीषा कोठारी या मुंबईतील लँग्वेजिईस्ट (LANGUAGE'IST) या परकीय भाषा शिकविणाऱ्या संस्थेच्या सह-संस्थापिका आहेत )
संबंधित बातम्या