Cancer Causing Chemical in Panipuri: पाणीपुरी हे एक स्ट्रीट फूड आहे, ज्याच्या नावाने प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येते. बहुतेक लोकांना संध्याकाळच्या स्नॅकमध्ये ते खायला आवडते. तर काही लोक संध्याकाळची भूक भागवण्यासाठी देखील पाणीपुरी खातात. भारतातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ती ओळखली जाते. काही जण याला गोलगप्पे म्हणतात तर काही ठिकाणी पुचका म्हणतात. याशिवाय देखील या स्ट्रीट फूडचे अनेक नावे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की कर्नाटकातील २२ टक्के पाणीपुरीचे नमुने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) गुणवत्तेच्या मानकांच्या मागे आहेत? जाणून घ्या सविस्तर
डेक्कन हेराल्डच्या एका अहवालानुसार, कर्नाटकात विकल्या जाणाऱ्या पाणीपुरीपैकी सुमारे २२ टक्के पाणीपुरी एफएसएसएआयच्या सुरक्षा मानकांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहे. अधिकाऱ्यांनी राज्यभरातून पाणीपुरीचे २६० नमुने गोळा केले होते. त्यापैकी ४१ मध्ये कृत्रिम रंग तसेच कर्करोगास कारणीभूत घटक असल्याने ते असुरक्षित मानले गेले. याशिवाय १८ निकृष्ट दर्जाचे आणि खाण्यास असुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. अनेक नमुने शिळे आणि मानवी वापरास योग्य नसल्याचे आढळले. पाणीपुरीच्या नमुन्यांमध्ये ब्रिलियंट ब्ल्यू, सनसेट यलो आणि टार्ट्राझिन सारखी रसायने आढळली, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
कोबी मंचूरियन आणि कॉटन कँडी सारख्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फूड कलरिंग एजंट रोडामाइन-बी वर कर्नाटक सरकारने बंदी घातली होती.
प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरीचे पाणी बनवतो. मात्र त्यात कोणत्याही प्रकारची रासायनिक किंवा रंगाची भेसळ असेल तर तुम्ही ते सहज ओळखू शकता. लक्षात ठेवा पाणी चिंचेचे असेल तर ते हलक्या तपकिरी रंगाचे असेल. दुसरीकडे कोथिंबिरी पुदिन्याचे पाणी असेल तर ते डार्क हिरवे असेल. पाण्याचा रंग हलका झाला तर त्यात अॅसिडची भेसळ केलेली असू शकते. पाणीपुरीमध्ये अॅसिड असेल तर चव कडू वाटेल आणि पोटात लगेच जळजळ होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)