मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Infertility Problem: योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या? पाहा काय सांगतात तज्ज्ञ

Infertility Problem: योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या? पाहा काय सांगतात तज्ज्ञ

Hiral Shriram Gawande HT Marathi
May 30, 2024 10:54 PM IST

Women Health Tips: योनिमार्गातील कोरडेपणा आणि वंध्यत्व यांच्यातील परस्परसंबंध काय? योनीमार्गाच्या कोरडेपणाकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते याबाबत जाणून घ्या.

योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या
योनीमार्गातील कोरडेपणामुळे येऊ शकते वंध्यत्वाची समस्या (freepik)

Vaginal Dryness Can Cause Infertility: योनिमार्गातील कोरडेपणा स्त्रीसाठी केवळ ही निराशाजनक स्थिती आणि अस्वस्थता निर्माण करत नाही तर त्यामुळे वंध्यत्वासारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते. जेव्हा योनीमार्गात पुरेसे लुब्रिकेशन होत नाही, तेव्हा स्त्रियांना योनिमार्गाच्या कोरडेपणाचा त्रास होऊ शकतो. जो सामान्यतः वयस्कर स्त्रियांमध्ये दिसून येतो, विशेषत: रजोनिवृत्तीनंतर ही समस्या आढळून येते. परंतु हल्ली मोठ्या संख्येने तरुण स्त्रिया या समस्येने त्रस्त आहेत. ज्यामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा परिणाम होतो. योनीमार्गाच्या कोरडेपणाचे वेळीच व्यवस्थापन केल्यास गर्भधारणेची शक्यता वाढू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

योनीमार्गातील कोरडेपणामुळे येणारी समस्या

योनीमध्ये ओलावा नसल्यामुळे संभोगात अडथळे येऊ शकतात किंवा संभोगादरम्यान वेदना होऊ शकतात. ज्यामुळे गर्भधारणेत अडचणी निर्माण होतात. योनिमार्गातील कोरडेपणा हे हार्मोनल असंतुलन किंवा प्रजननक्षमतेवर परिणाम करणारे अंतर्निहित आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते. जेव्हा योनीमार्ग कोरडा असतो अशावेळी शुक्राणू गर्भाधान प्रक्रियेसाठी गर्भाशय मुख आणि फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे इतर ज्ञात प्रजनन समस्या नसतानाही यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होऊ शकते. यशस्वीपणे गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी योग्य लुब्रिकेशन तंत्राद्वारे योनिमार्गातील कोरडेपणा दूर करणे किंवा कोणतीही मूळ कारणे ओळखण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, अशी माहिती पुणे येथील अंकुरा हॉस्पिटलच्या सल्लागार प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रजनन विकार तज्ज्ञ डॉ. नमिता भालेराव यांनी दिली.

निर्माण होतात या समस्या

योनिमार्गात कोरडेपणा अनेक स्त्रियांना प्रभावित करते जेव्हा योनीची नैसर्गिक लुब्रिकेशन पद्धत मुख्यतः रजोनिवृत्ती दरम्यान योग्यरित्या कार्य करत नाही. योनामार्गातील कोरडेपणाची समस्या हार्मोनल बदल, मधुमेह, लैंगिक उत्तेजना कमी होणे, रासायनिक उत्पादनांची वापर, काही ठराविक औषधे आणि तणाव यासारख्या कारणांमुळे देखील उद्भवू शकते. योनीमार्गातील कोरडेपणामुळे संभोग दरम्यान अस्वस्थता आणि वेदना देखील होऊ शकतात. योनीमार्गात कोरडेपणा हे वंध्यत्वाचे थेट कारण नसले तरी, अधिक घर्षणामुळे तुम्हाला लैंगिक क्रियांचा आनंद घेणे अशक्य होऊ शकते. त्यामुळे स्त्रियांसाठी गर्भधारणा आव्हानात्मक ठरु शकते अशी माहिती लुल्लानगर, पुणे येथील मदरहूड हॉस्पिटल्सच्या सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचेता पार्टे यांनी दिली.

काय काळजी घ्यावी

योनिमार्गाच्या कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि वेदना व्यवस्थापित करण्यासाठी योनिमार्गात लुब्रिकेशनचा वापर करावा . योनीमार्गातील ओलाव टिकविण्यासाठी हायड्रेटेड रहा. कारण दीर्घकाळ कोरडेपणा डिहायड्रेशनसाठी कारणीभूत ठरू शकतो. खाज सुटणे आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेल वापरा. डाऊचिंग आणि रसायनांचा समावेश असलेल्या उत्पादनांचा वापर टाळा. या टिप्स योनिमार्गाच्या कोरडेपणावर मात करण्यास, सेक्सचा आनंद घेण्यास आणि गर्भधारणेचे स्वप्न पूर्ण करण्यास नक्कीच मदत करतील अशी प्रतिक्रिया डॉ. नमिता भालेराव यांनी दिली.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel