Breakfast Recipe: डाळ-तांदूळ नाही पोह्यापासून बनवा स्वादिष्ट इडली, लगेच नोट करा रेसिपी-breakfast south indian recipes how to make poha idli ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Breakfast Recipe: डाळ-तांदूळ नाही पोह्यापासून बनवा स्वादिष्ट इडली, लगेच नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: डाळ-तांदूळ नाही पोह्यापासून बनवा स्वादिष्ट इडली, लगेच नोट करा रेसिपी

Aug 29, 2024 09:09 AM IST

How to make Poha Idli: मोठ्या सेलिब्रिटींनाही न्याहारीसाठी डोसा किंवा इडली खायला आवडते. हे पदार्थ बनवायला जितके सोपे तितकेच चवीला स्वादिष्ट असतात. त्यामुळेच लोक या पदार्थांचे फॅन बनले आहेत.

poha idli
poha idli

Poha Idli Recipe: दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांनी देशभर ओळख निर्माण केली आहे. जेव्हा जेव्हा निरोगी अन्नपदार्थांचा उल्लेख केला जातो, तेव्हा तेव्हा लोक दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांना प्राधान्य देतात. विशेषत: इडली आणि डोसा. बहुतांश लोक हे पदार्थ मोठ्या उत्साहाने खातात. मोठ्या सेलिब्रिटींनाही न्याहारीसाठी डोसा किंवा इडली खायला आवडते. हे पदार्थ बनवायला जितके सोपे तितकेच चवीला स्वादिष्ट असतात. त्यामुळेच लोक या पदार्थांचे फॅन बनले आहेत.

साऊथ इंडियन डोसा-इडली जर पारंपारिक पद्धतीने बनवले, तर तुम्हाला उडीद डाळ आणि तांदूळ लागेल. परंतु जर तुम्हाला तांदूळ-डाळ न आंबवता झटपट इडली बनवायची असेल, तर तुम्ही पोहे वापरून इडली तयार करू शकता. पोहे इडली बनवणे देखील खूप सोपं आहे. खरे तर ही पद्धत डाळ-तांदळाच्या इडलीपेक्षा सोपी असेल. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी स्वादिष्ट पोहे इडली कशी बनवायची ते सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हालाही त्याचा आस्वाद घेता येईल. विशेष म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानांच ही इडली प्रचंड आवडेल.

पोहा इडली बनवण्याचे साहित्य-

-पोहे - १ कप

-रवा - १ कप

-दही -१ कप

-मीठ - चवीनुसार

-इनो - १ टीस्पून

तेल (इडली पात्राला लावण्यासाठी)

 

पोहा इडलीची रेसिपी-

पोह्यांपासून इडली बनवण्यासाठी, सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुवून घ्या. नंतर १० मिनिटे पाण्यात भिजवा. आता पोहे पाण्यातून काढून मिक्सरमध्ये बारीक करून घट्ट पेस्ट बनवा. पोह्यांची पेस्ट तयार झाल्यावर एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात रवा आणि दही मिसळा. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. आणि जाडसर पिठ तयार करा. जर ते खूप घट्ट झाले असेल तर त्यात थोडे पाणी मिसळा.

आता हे तयार पिठ १५-२० मिनिटे झाकून ठेवा. म्हणजे रवा व्यवस्थित फुगतो. २० मिनिटांनंतर पिठात चवीनुसार मीठ घाला. आता इडली स्टीमर तयार करा. स्टीमरमध्ये पाणी भरून गॅसवर ठेवा उकळायला ठेवा. यासोबतच इडलीच्या साच्यात हलकेसे तेल लावा. पाणी उकळू लागले की, पिठात इनो घाला आणि लगेच मिक्स करा. इनो घातल्यानंतर पीठ वाढू लागेल. आता प्रत्येक इडलीच्या साच्यात पीठ घाला, पण साचा पूर्णपणे भरणार नाही याची काळजी घ्या. आता मध्यम आचेवर १० ते १५ मिनिटे इडल्या वाफवून घ्या. मध्यभागी चाकू किंवा टूथपीक घालून इडली तपासा. ते स्वच्छ बाहेर आल्यास इडली तयार आहे. इडली तयार झाल्यावर बाहेर काढून सांबार आणि चटणीसोबत सर्व्ह करा.