Breakfast Recipe: मुलांना खाण्यापिण्याची फार इच्छा नसते. त्यामुळेच पालक त्यांच्या मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन पौष्टिक पाककृतींच्या शोधात असतात. पावसाळयात हलक्या आणि आरोग्यदायी पाककृती केवळ चवीनेच परिपूर्ण नसतात तर मुलांची पचनसंस्था मजबूत करण्यासदेखील मदत करतात. अशीच एक खास रेसिपी म्हणजे रव्याची चविष्ट आणि पौष्टिक टिक्की होय. फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असलेली ही खास रेसिपी शरीराला अनेक फायदे देते. जाणून घेऊया ही रव्याची टिक्की कशी बनवली जाते.
-पोहे १ वाटी
-रवा १/२ कप
-दही १/२ कप
-चिली फ्लेक्स १/२ टीस्पून
-ओरेगॅनो १/२ टीस्पून
-मोहरी १/२ टीस्पून
-तीळ १ टीस्पून
-हिंग १ चिमूटभर
-कोथिंबीर २ चमचे
-चवीनुसार मीठ
-ही टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम एक कप पोहे पाण्यात भिजवायला ठेवा. दुसरीकडे एका भांड्यात अर्धी वाटी रवा घ्या.
-रव्यामध्ये दही मिसळा आणि १० मिनिटे झाकून ठेवा. आता भिजवलेल्या पोह्यातील पाणी वेगळे करा.
-रव्याच्या मिश्रणात पोहे घालून मिक्स करा. आता चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं एकजीव करून घ्या.
- आता हातावर तेलाचे काही थेंब घ्या आणि तयार मिश्रणाच्या छोट्या पॅटीस करा आणि वाफवण्यासाठी ठेवा.
-त्यांची वाफ काढण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन ते जाळीवर ठेवा.
-आता एका कढईत १ चमचा तेल घालून त्यात हिंग, मोहरी, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि चिरलेली कोथिंबीर घालून परतावे.
-आता तयार रव्याची टिक्की एका प्लेटमध्ये घेऊन पुदिन्याची चटणी किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
दह्याचे सेवन केल्याने शरीराला लॅक्टोबॅसिलससारखे निरोगी बॅक्टेरिया मिळतात. ते खाल्ल्याने प्रथिनांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हाडांच्या ऊतींची दुरुस्ती होते आणि हाडे मजबूत होतात. त्यामुळे दातांच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. याशिवाय भूक नियंत्रित करण्यासाठी हे फायदेशीर आहे.
रव्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये प्रथिने, फायबर आणि बी जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. वारंवार भूक लागण्याची समस्यादेखील रव्याच्या सेवनाने नियंत्रित केली जाऊ शकते.
आहारात तीळाचा समावेश केल्याने पॉलीअनसॅच्युरेटेड हेल्दी फॅट्स मिळतात. याशिवाय फायबर आणि प्रोटीनचे प्रमाणही आढळते. हे शरीरातील निरोगी वजन राखण्यास मदत करते. तिळामध्ये आढळणाऱ्या ओमेगा ३ फॅटी ॲसिड्समुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.