‘लव्ह जिहाद’ ही संकल्पना एक थोतांड असून सोशल मीडियावर खोट्या गोष्टींद्वारे ही संकल्पना व्हायरल करण्यात येत असल्याचा दावा लेखक श्रीनिवासन जैन, मरियम अलवी आणि सुप्रिया शर्मा यांनी केला आहे. 'लव्ह जिहाद अँड अदर फिक्शन्स : सिम्पल फॅक्ट्स टू काउंटर व्हायरल फॉल्स' असं या पुस्तकाचे नाव असून यासाठी लेखकांनी सखोल संशोधन केले असल्याचा दावा केला आहे. भारतात विविध राज्यांत होणाऱ्या लव्ह जिहादच्या घटना, भारतात मुस्लिमांचे तुष्टीकरण आणि लग्नासाठी केले जाणारे बळजबरीचे धर्मांतर या धादांत खोट्या गोष्टी असून याचे सत्य समोर आणण्यासाठी पुस्तकात तथ्य मांडण्यात आल्याचा दावा तीन लेखकांनी केला आहे.
दररोज लाखो भारतीयांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आणि सोशल मीडियावर लव्ह जिहादविषयी खूप काही मजकूर फॉरवर्ड होत असतो. सोशल मीडियावरील अशा व्हायरल गोष्टींची सत्यता पडताळून हे पुस्तक लिहिण्यात आल्याचं लेखकांनी म्हटलं आहे. पुस्तक लिहिण्यासाठी लेखकांंनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत अनेक अर्ज दाखल केले होते. शिवाय विविध सरकारी नोंदी पडताळून पाहिल्या होत्या. लव्ह जिहाद संदर्भात संसदेत उपस्थित झालेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचाही पुस्तक लिहिण्यासाठी आधार घेण्यात आला होता. शिवाय लेखकांनी लव्ह जिहादसंदर्भात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराच्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. लव्ह जिहाद संदर्भात उपलब्ध शैक्षणिक संशोधन अहवाल वाचले असल्याचं लेखकांनी म्हटले आहे. ‘अलेफ’ या प्रकाशन संस्थेने हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित केले आहे.
भारतात ‘लव्ह जिहाद’चा आरोप अनेक दशकांपासून होतोय. हा विषय पूर्वी दबक्या आवाजाने बोलला जायचा. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये हा विषय केंद्रस्थानी आला आहे. सोशल मीडियाचा वापर करून कपटी मार्गाने याबाबत खोटा प्रचार करण्याचे काम सुरू असल्याचं लेखकांनी या पुस्तकात लिहिले आहे. या पुस्तकात देशातल्या सर्वात पहिल्या ‘लव्ह जिहाद’चा आरोप झालेल्या प्रकरणाची सत्यता तपासून पाहण्यात आली आहे.
या विषयाच्या अनुषंगाने 'पॉप्युलेशन जिहाद'च्या नावाखाली मुस्लिमांच्या लोकसंख्यावाढीच्या मुद्दाला पुस्तकात हात घालण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या आजच्या युगात व्हॉट्सअ ॅप फॉरवर्डद्वारे 'पॉप्युलेशन जिहाद'चा जोरात प्रचार करण्यात येतोय. मुस्लिमांच्या लोकसंख्येत अनियंत्रित वाढ होत असल्याच्या ऑनलाइन पोस्टमध्ये अनेकदा मोठ्या मुस्लीम कुटुंबांची छायाचित्रे दाखवली जातात. यातली बरीच छायाचित्रे ही कधीकधी भारताबाहेरील असल्याचा धक्कादायक निष्कर्ष या पुस्तकात देण्यात आला आहे.
भारतात खरोखर बळजबरीने धर्मांतर होतय का, या विषयाचाही उहापोह या पुस्तकात लेखकांनी केला आहे. यातील बहुतेक षड्यंत्र सिद्धांत हे इस्लामी सत्तास्थापनेच्या भीतीभोवती केंद्रित असल्याचे लेखकांचे म्हणणे आहे. मुस्लीम पुरुषांना चार चार बायका करण्याची परवानगीचा विषय, हज सबसिडी, मदरशांना सरकारी निधी मिळणे, दिवाळी आणि ईदला विजेची असमान उपलब्धता या दाव्यांच्या सत्यतेचा शोध या पुस्तकातून लेखकांनी घेतला आहे.
संबंधित बातम्या