भारत हा जगातला एकमेव असा देश आहे जिथे वाघांची सर्वाधिक संख्या आहे. सध्या भारताच्या विविध जंगलांमध्ये एकूण ३,१६७ एवढे वाघ असल्याचे सरकारची आकडेवारी सांगते. त्यामुळे भारताला वाघाचे माहेरघर म्हटले जाते. मार्जार कुळातील प्राणी असलेला वाघ हा उष्णकटिबंधीय जंगलात आढळतो. जंगलात अन्नसाखळीत वाघाचे सर्वोच्च स्थान असते. वाघ तसा एकटा रहाणारा प्राणी. तो आपले क्षेत्रफळ (टेरिटरी) राखून ठेवतो. साठ आणि सत्तरच्या दशकात विविध कारणाने वाघांची संख्या कमी होत होती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे वाघांचे प्राकृतिक अधिवास नष्ट होणे आणि तस्करी हे होते. १९७३ साली 'प्रोजेक्ट टायगर' अंतर्गत केंद्र सरकारने वाघाला संरक्षित प्राणी म्हणून जाहीर केले.
भारतात पंजाब आणि राजस्थान सोडून जवळपास सर्व राज्यांच्या जंगलात कमी अधिक प्रमाणात वाघ आढळतो. १९५५ साली अस्तित्वात आलेले चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हे वाघाचे भारतातील सर्वात मोठे आणि विस्तृत असे वसतीस्थान ठरले आहे. सद्यस्थितीत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ९३ पेक्षा अधिक वाघ आहेत. वाघाची शारीरिक रचना, चाल, गर्जना आणि अफाट ताकदीमुळे जंगलात वावरणारा वाघ हा माणसाच्या नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे वाघाचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो पर्यटकांची पावले देशातील विविध व्याघ्रप्रकल्पाकडे वळत असतात. जंगलाच्या या राजाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक वन्यजीवप्रेमीच्या मनात प्रचंड कुतूहल असते. निबीड अरण्यात वाघ जगतो कसा, तो शिकार कसा करतो, त्याचे जीवशास्त्रीय चक्र कसे असते, त्याचा दिनक्रम, अधिवास, अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची धडपड, आईवडीलांशी नातं या एक ना अनेक गोष्टींचे कुतूहल माणसाच्या मनात निर्माण होणे तसे साहजिक असते. जंगलातील वाघाबद्दल तुमच्या मनात असलेल्या बहुतांश कुतूहलाची उत्तरे पत्रकार, पर्यावरण लेखक अनंत सोनवणे यांनी अथक परिश्रम आणि सखोल संशोधन करून लिहिलेल्या ‘एक होती माया’ या पुस्तकातून नक्की मिळू शकतात.
‘एक होती माया’ हे पुस्तक तसे पाहिले तर चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील ‘माया’ या पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या एका वाघिणीची जीवनकहाणी आहे. प्रत्येक व्याघ्रप्रकल्पात नवीन जन्माला आलेल्या वाघाच्या बछड्याचे गाइड्सकडून विशिष्ट असे नामकरण करण्यात येते. २०१० साली 'माया'च्या जन्मापासून ते ती या जंगलातून २०२३ साली अचानक गायब होण्यापर्यंतची म्हणजे एकूण १३ वर्षांची तपशीलवार जीवनकहाणी या पुस्तकात वाचायला मिळते. २०२३ मध्ये ‘माया’ जंगलातून अचानक गायब झाल्यानंतर एकच गहजब झाला होता. 'माया'ला शोधण्यासाठी वनविभागाने मोठी शोधमोहिमही राबवली होती. परंतु तिचा ठावठिकाणा काही लागला नाही. शिवाय ‘माया’ वाघीण जीवंत नसल्याचा पुरावा देखील कुणाला सापडलेला नाही. त्यामुळे ‘एक होती माया’ म्हणजे ती आता नाही असा याचा अर्थ आहे. जंगलातील एखाद्या प्राण्याची चहुअंगाने पुस्तकरुपाने मांडलेली ही अनोखी अशी कहाणी आहे.
ताडोबाच्या जंगलात अनेक वाघ-वाघीण असताना नेमकी ‘माया’ ही वाघीण पर्यटकांना भुरळ पाडणारी ठरली होती. त्याला अनेक कारणेही होती. ही कारणे कोणती होती? जंगलात निष्णात शिकारी असलेली, पर्यटक-स्नेही, 'पोस्टर-गर्ल' वाटणाऱ्या मायाची अनेक रुपं लेखकाने या पुस्तकातून मांडली आहेत. पिल्लांना वाढवताना मायेची उब देत त्यांना जीव एकवटून जपणारी माया दुसरीकडे आपल्या टेरिटरीचं रक्षण करताना नर वाघांवर प्रचंड दहशत निर्माण करायची. याच माया वाघिणीने जंगलात तिच्या टेरिटरीत प्रवेश केलेल्या चार व्यक्तींवर हल्ले करून ठार केले होते. एकूणच मायाच्या निमित्ताने वाघ या प्राण्याचं जंगलातलं जीवन कसं असतं, त्याला किती संघर्ष करावा लागतो, एकाचवेळी किती आघाड्यांवर लढावं लागतं याची कहाणी ललित लेखन पद्धतीने पुस्तकातून मांडण्यात आले आहे. पुस्तकात अनेक फोटोंच्या माध्यमातून ‘माया’ वाघिणीचे बालपण, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था मांडण्याचा सुंदर प्रयत्न लेखकाने केलेला आहे. साहजिकच वाघ या प्राण्याबद्दल आपल्या समाजात केवळ सहानुभूतीच नव्हे तर आदर आणि प्रेमाची भावना निर्माण करणे हा पुस्तकामागचा हेतु असल्याचं लेखक अनंत सोनवणे नमूद करतात.
'माया' वाघीण ही अनंत सोनवणे यांच्या ‘एक होती माया’ या पुस्तकाचं मध्यवर्ती पात्र आहे. नव्हे मुख्य नायिकाच आहे. त्यामुळे माया वाघिणीचा जन्म, तिचे आईवडील कोण होते, तिची तरुण होण्याची, आईवडिलांपासून वेगळं होऊन स्वतःची टेरिटरी आखण्याची, नर वाघांशी मिलन होऊन पिल्लांना जन्म घालण्याची अतिशय रंजक, रोचक आणि तपशीलवार कहाणी लेखकाने पुस्तकातून मांडली आहे. या संपूर्ण जीवनप्रवासाच्या विविध टप्प्यावर मायाची वागणूक कशी होती, याचे तपशीलवार बारकावे तर थक्क करणारे असेच आहेत. लेखक खुद्द ताडोबा व्याघ्रप्रकल्पात कम्युनिकेशन ऑफिसर म्हणून कार्यरत असल्याने ताडोबात पर्यटकांसोबत दररोज फिरणारे गाइड्स, वन कर्मचारी, वनमजूर यांच्याशी बोलून तसेच वनखात्यातील नोंदीचा आधार घेऊन लेखकाने अतिशय ओघवत्या शैलीत ही कहाणी पुस्तकात मांडली आहे.
माया ही वाघीण होती. परंतु जंगलात नर वाघ आणि मादी वाघिणीच्या जगण्यात सूक्ष्म फरक असतो, तो कोणता? जंगलात माजावर आलेली वाघीण प्रणयासाठी जोडीदार कसा निवडते, गरोदर वाघिणीची मानसिक स्थिती कशी असते, पिल्लांचा जन्म दिल्यानंतर ती त्यांचे संगोपन, जपवणूक करताना कोणती काळजी घेत असते, जंगलातील इतर हिंस्त्र प्राण्यांपासून पिल्लांचे संरक्षण कसे करते, पिल्लांना शिकारीचे प्रशिक्षण कसे देते, जंगलात वावरताना वाघापेक्षा वाघिण ही कशी धोरणात्मक पद्धतीने वेगळं वागत असते, हे अनेक घटना आणि प्रसंगांच्या माध्यमातून वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळते.
‘एक होती माया’ या पुस्तकाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात विषद केलेल्या प्रसंगानुरूप ठिकठिकाणी वापरण्यात आलेली ‘माया’ वाघिणीची छायाचित्रे हे होय. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात वाघ बघायला देश -विदेशातून पर्यटक येत असतात. शिवाय वनखात्याचे अधिकारी, वनमजूर हे व्याघ्रप्रकल्पात विविध कामानिमित्ताने जंगलात सतत फेऱ्या मारत असतात. अशावेळी समोर दिसलेल्या वाघाच्या अनेक मुद्रा टिपल्या जात असतात. त्यात माया ही तर वन्यजीव छायाचित्रकारांची लाडकी वाघीण. लेखकाने विविध फोटोग्राफर्सकडून ‘माया’चे फोटो मिळवून, त्याचे संकलन करून दीडशे पानाच्या पुस्तकात माया वाघिणीचे विविध मुद्रेतले तब्बल ८० फोटो वापरले आहेत. यात माया वाघीण जंगलात रानकुत्रा, सांबर, चितळ, रानडुक्करची शिकार करत असलेले फोटो, ‘माया’चे विविध वाघांशी झालेल्या प्रणय प्रसंगाचे फोटो तसेच टेरिटरीच्या वादातून नर वाघांशी झालेल्या झुंजीचे फोटो विविध छायाचित्रकारांनी त्या-त्या प्रसंगी टिपले होते. ते सर्व अफलातून फोटो या पुस्तकात पहायला मिळतात. त्यामुळे पुस्तकातील प्रकरणांमध्ये विषद केलेले प्रसंग फोटोच्या माध्यमातून संगती लावून एक प्रकारे वाचकाच्या डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतो. माया वाघिणीने १३ वर्षाच्या वास्तव्यादरम्यान ताडोबाच्या जंगलात चार व्यक्तींवर हल्ले करून त्यांना ठार मारलं होतं. हे प्रसंग घडलेल्या घटनास्थळाचे काल्पनिक रेखाचित्र पुस्तकात वापरल्याने प्रसंगाचं गांभीर्य लक्षात येते.
वन्य प्राण्यांबद्दल मराठी साहित्यात सतत लिखाण होत आलेलं आहे. अशाप्रकारच्या लिखाणामुळे निसर्ग, वन्यजीव याबद्दलच्या माहितीचा भर पडून त्याचा अधिक प्रसार होऊन समाजात निसर्गप्रेम वाढीला लागण्यास एकप्रकारे मदत होत असते. ‘एक होती माया’ या पुस्तकात ताडोबाच्या जंगलाच्या कानाकोपऱ्याची सखोल माहिती लेखकाने दिलेली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील विविध विभाग जसे मोहर्ली, कोलारा, ताडोबा तलाव परिसर, पांढरपवनी पानवठे, जामुनझोरा, पांचधारा हे जंगल विभाग आणि त्यांची वैशिष्टे याचा ठिकठिकाणी उल्लेख पुस्तकात येतो. ही सर्व माहिती जंगल भ्रमण करणाऱ्यांसाठी मोलाची अशी आहे. पुस्तकात योग्य त्या ठिकाणी नकाशांच्या माध्यमातून ताडोबा व्याघ्रप्रकल्पाची व्याप्ती दर्शवण्यात आली आहे. शिवाय पुस्तकाच्या अखेरीस ‘माया’ वाघिणीच्या वंशावळचा तक्ता माहितीपूर्ण असा आहे.
सोशल मीडियावर माया वाघिणीचे फोटो प्रचंड शेअर केले जात असत. २०१६ साली भारतीय पोस्ट खात्याने ‘माया’ वाघिणीवर टपाल तिकीट प्रकाशित केले होते. २०२१ साली ‘नॅशनल जिओग्राफिक’ चॅनलने ऐश्वर्य श्रीधर दिग्दर्शित ‘टायगर क्विन ऑफ तारु’ नावाने माया वाघिणीवर एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती. माया वाघिणीच्या लोकप्रियतेचा अंदाज यातून येतो.
ओघवत्या शैलीत आणि भरपूर माहीतीचा समावेश असलेल्या ‘एक होती माया’ या पुस्तकामुळे वाघाबद्दलचं कुतूहल आणखी जागृत होऊन त्याच्या संवर्धनामध्ये नक्कीच मदत होणार आहे. केवळ व्याघ्रप्रेमींनीच नव्हे तर निसर्गाबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.
पुस्तकाचे नावः एक होती माया
लेखकः अनंत सोनवणे
पृष्ठ संख्याः १५६
प्रकाशकः ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर
मूल्यः ४५० रुपये
संबंधित बातम्या