Bladder Cancer Awareness Month 2024: या कारणांमुळे होतो मूत्राशय कर्करोग, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bladder Cancer Awareness Month 2024: या कारणांमुळे होतो मूत्राशय कर्करोग, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Bladder Cancer Awareness Month 2024: या कारणांमुळे होतो मूत्राशय कर्करोग, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

May 24, 2024 10:29 PM IST

Bladder Cancer Awareness Month 2024: मे महिना हा ब्लॅडर कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. मूत्राशय कर्करोगाची कारणे आणि लक्षणे जाणून घ्या.

ब्लॅडर कॅन्सर अवेअरनेस मंथ - मूत्राशय कर्करोगाची कारणे आणि लक्षणे
ब्लॅडर कॅन्सर अवेअरनेस मंथ - मूत्राशय कर्करोगाची कारणे आणि लक्षणे (unsplash)

Causes and Symptoms of Bladder Cancer: ओटीपोटाच्या खालच्या भागात त्रिकोणी आकाराचा स्नायूचा अवयव असतो. याला मूत्राशय (ब्लॅडर) म्हणतात. या ठिकाणी लघवी जमा होते. मुत्राशयामध्ये जेंव्हा मूत्र जमा होते तेंव्हा ते काहीसे सैल असते आणि पसरते. लघवी होताच ते लहान, सपाट होते. मूत्राशयाचा कर्करोग हा यूरोलॉजिकल कर्करोगाचा एक प्रकार आहे. हा कर्करोग मूत्राशयाच्या आत असलेल्या पेशींमध्ये सुरू होतो. या प्रकारच्या कर्करोगात अनियंत्रित पेशींची वाढ दिसून येते. उपचार न केल्यास, ते शरीराच्या इतर भागांमध्ये जसे की लिम्फ नोड्स, हाडे, फुफ्फुसे आणि यकृतामध्ये पसरते. या कर्करोगाबाबत फारशी जागरुकता नसल्याने अनेक वेळा दुर्लक्षित होतात. या कर्करोगाची कारणे आणि लक्षणे जाणून घेणे अधिक चांगले आहे, जेणेकरून रुग्णाच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत घेणे शक्य होईल. सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मनोज लोखंडे यांनी या कर्करोगाची कारणे आणि लक्षणे सांगितले.

मूत्राशय कर्करोगाची कारणे

धुम्रपान किंवा सेकंडहँड स्मोकिंग, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, कौटुंबिक इतिहास, कॅथेटरचा वापर, वारंवार मूत्रमार्गातील जंतू संसर्ग (यूटीआय), वाढते वय, प्रोस्टेट वाढणे आणि कामाच्या ठिकाणी काही ठराविक रसायनांचा संपर्क यामुळे मूत्राशय कर्करोग होऊ शकते.

मूत्राशय कर्करोगाची लक्षणं

हेमॅटचुरिया किंवा लघवीमध्ये रक्त येणे हे या कर्करोगाच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. सतत आणि वारंवार लघवी होणे, वेदना आणि अस्वस्थता, लघवी करण्यास असमर्थता, लघवी करताना जळजळ होणे किंवा पाठीच्या खालच्या भागात दुखणे ही कॅन्सरची धोक्याची चिन्हे आहेत. निदान झाल्यानंतर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. मूत्राशयाच्या कर्करोगाचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी आणखी विलंब न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

काय काळजी घ्यावी

रुग्णाला सूचित करण्यात आलेली उपचार प्रक्रिया ही शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी अशा स्वरूपात असते. डॉक्टर तुमच्यासाठी योग्य अशी उपचार पद्धतीची निवड करतील. या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी धूम्रपान सोडा, पुरेसे पाणी पीत रहा, रसायनांचा संपर्क मर्यादित करा, योग्य आहाराचे सेवन करा, दररोज व्यायाम करा आणि मूत्राशयाच्या संसर्गाकडे दुर्लक्ष न करता त्यांचे उपचार करा. सतर्क राहून आणि निरोगी जीवनशैली निवडा जेणेकरुन मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner