Health Benefits of Bajra Roti or Bhakri: आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. असेच प्रत्येक सणाला काही विशिष्ट पदार्थ बनवले जातात आणि खाल्ले जातात. हे फक्त सणाची चव वाढवण्यासाठी केले जात नाही तर ते आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते. असेच संक्रांतीच्या आदल्या दिवशी केल्या जाणाऱ्या भोगीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर पोषक असतात. जाणून घ्या बाजरीच्या भाकरीचे आरोग्यासाठी काय फायदे होतात आणि हे कसे बनवायचे.
बाजरीची भाकरी बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे - बाजरीचे पीठ, गरम पाणी आणि तूप
- भाकरी बनवण्यासाठी एका ताटात बाजरीचे पीठ घ्या. त्यात थोडे थोडे गरम पाणी शिंपडा आणि पीठ मळून घ्या. ते बरेच मऊ असते. बाजरीचे पीठ मळताना खूप संयम आणि सराव करावा लागतो. एका वेळी फक्त थोडे पीठ मळून घ्या. आता एक लहान गोळा घ्या आणि आपल्या तळहाताने दाबा. आता तळहातांच्या मदतीने थापून भाकरी बनवा. ही भाकरी तुटणार नाही याची काळजी घ्या. भाकरी हळूहळू बनवा. घाई केल्यास भाकरी तुटू शकते. हव्या त्या आकाराच्या भाकरी बनवा आणि गरम तव्यावर ठेवा. त्यावर थोडेसे पाणी टाकून नीट पसरवून घ्या. आता भाकरी दोन्ही बाजूंनी शिजवा. शिजल्यावर तूप लावून सर्व्ह करा. बाजरीची भाकरी नेहमी तुपासह सर्व्ह करा. कारण ती खूप कोरडी असते.
कधी-कधी जंक फूडच नाही तर आहारात कमी प्रथिने आणि जास्त कार्बोहायड्रेट घेतल्याने वजन झपाट्याने वाढते. वजन वाढण्याची पहिली सुरुवात म्हणजे पोटाभोवती चरबी जमा होणे. पोटाची चरबी वाढणे हे तुमचे वजन वाढण्याचे लक्षण आहे. जे लोक वाढत्या वजनाने त्रस्त आहेत आणि वजन कमी करू इच्छितात त्यांनी आपल्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने लवकर भूक लागत नाही. अशा स्थितीत पोटाची चरबी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी गव्हाच्या पोळीऐवजी काही दिवस बाजरीची भाकरी खाऊ शकता.
बाजरी ग्लूटेन फ्री असते, जी शरीरासाठी फायदेशीर असते. बर्याच वेळा असे दिसून आले आहे की ग्लूटेनयुक्त अन्न खाल्ल्याने पचनामध्ये समस्या निर्माण होतात. म्हणून बरेच लोक त्याऐवजी ग्लूटेन-मुक्त आहार घेणे पसंत करतात. यासाठी बाजरी हा अतिशय आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. बाजरीमध्ये भरपूर फायबर असल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. बाजरी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी आपल्या आहारात बाजरीचा समावेश करावा. असे केल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)