Benefits Of Panchamrit: सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिन्यात विविध नैवेद्याचे पदार्थ बनवले जातात. त्यातीलच एक म्हणजे पंचामृत होय. पंचामृतला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. पंचामृत हे विशेषकरून भगवान श्रीकृष्णाचे आवडते नैवेद्य असल्याचे मानले जाते. पंचामृत हे अनेक पारंपारिक हिंदू विधींमध्ये बनवले जाते. स्वादिष्ट असण्यासोबतच त्याचे स्वतःचे एक धार्मिक महत्त्वदेखील आहे. श्रावण, जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सर्वांनी पंचामृत सेवन केले असेलच. पण तुम्हाला माहिती आहे का की, धार्मिक महत्त्वासोबतच पंचामृतचे आरोग्यासाठीही खूप महत्त्व आहे. आज आपण पंचामृतच्या याच आरोग्यविषयक फायद्यांबाबत जाणून घेणार आहोत.
आयुर्वेदात दूध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. वाराणसीच्या एसएएस आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी वैद्य प्रशांत मिश्रा यांच्या मते, हे मिश्रण प्यायल्याने शरीरातील ७ धातू वाढतात. म्हणजेच रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि वीर्य यांची वाढ करून शरीर बलवान बनण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गजन्य आजारही टाळता येतात. आयुर्वेदाचार्य मिश्रा यांच्यानुसार पंचामृतामध्ये सर्व वस्तूंचे विशेष प्रमाण घेतले जाते. पंचामृत बनवताना तूप आणि मधाच्या प्रमाणाची विशेष काळजी घेतली जाते. कारण त्यांचे समान प्रमाण विषात बदलण्याची शक्यता असते.
-अनेक पारंपारिक हिंदू विधींमध्ये बनवलेले, पंचामृतला फक्त आध्यात्मिक आणि धार्मिक महत्वच नाही. तर, त्याचे आरोग्यविषयक फायदेदेखील आहेत. यामुळे त्वचेचा पोत, केसांची ताकद, शारीरिक ताकद, आणि दृष्टीदेखील सुधारते.
-पंचामृतमध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात. ज्यात मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. याशिवाय, पंचामृत तुम्हाला त्वरित शारीरिक ऊर्जा प्रदान करण्यातदेखील मदत करते.
-स्तनपान करणाऱ्या नवीन मातांसाठीही पंचामृत फायदेशीर आहे. कारण दूध आणि दहीसारख्या पोषक पदार्थांनी बनलेले हे पेय नव्या आईमध्ये दुधाची निर्मिती वाढवण्यास मदत करते.
-पंचामृत ब्रेन टॉनिक म्हणून काम करते. ज्यामुळे बौद्धिक शक्ती वाढते आणि स्मरणशक्तीदेखील सुधारते.
-तसेच पंचामृतमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स निष्क्रिय करण्यास मदत होते. शिवाय ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास तसेच सेल्युलर आरोग्यास फायदा देतात.
-पंचामृत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून बनवले जाते. त्यामुळे त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते. हाडांचे विकार दूर राहतात.
-पंचामृत स्त्री-पुरुषमधील वंध्यत्वातही मदत करते. कारण ते आपल्या गुणधर्मांनी प्रजनन प्रणाली मजबूत करते.