Ways To Reuse Expired Makeup: प्रत्येक मुलीला स्वतःला सुंदर आणि स्टायलिश ठेवायचे असते. ही इच्छा पूर्ण करून सौंदर्य वाढवण्याचे काम करते मेकअप. प्रत्येक मुली जवळ विविध प्रकारचे आणि विविध ब्रँड्सचे मेकअप प्रोडक्ट असतात. त्यातील काही प्रोडक्ट हे रेग्युलर वापरले जातात तर काही क्वचित वापरले जाता. अनेक वेळा खूप व्यस्त असल्यामुळे किंवा संधी न मिळाल्याने मेकअप प्रोडक्ट तसेच राहतात आणि कालांतराने ते एक्सपायर होतात. अशा परिस्थितीत हे महागडे ब्युटी प्रोडक्ट न वापरता फेकून देणे कोणत्याही महिलेसाठी त्रासदायक ठरू शकते. जर तुमच्याकडचे ब्युटी प्रोडक्ट देखील एक्सपायर झाले असेल पण तुम्हाला ते फेकून न देता पुन्हा वापरायचे असतील आणि ते सुद्धा कोणतेही दुष्परिणाम न होता तर या टिप्स तुमच्यासाठी आहे. तुम्ही या टिप्स फॉलो करून तुमचे एक्सपायर झालेले ब्युटी प्रोडक्ट पुन्हा वापरू शकता.
१. एक्सपायर झालेल्या लिपस्टिकपासून टिंटेड लिप बाम बनवता येतो. लिपस्टिक एका भांड्यात काढून गरम पाण्यात काही वेळ ठेवा. लिपस्टिक वितळेल आणि सर्व बॅक्टेरिया नष्ट होतील. आता त्यात व्हॅसलीन मिक्स करा. आता हे एका लहान डबीमध्ये भरा आणि फ्रिजमध्ये ठेवा. तुमचा लिप बाम तयार आहे.
२. जुनं झालेल्या लिप बामचा वापर नखांच्या सभोवतालच्या कोरड्या त्वचेचे पोषण करण्यासाठी करता येतो. आपण ते आपल्या टाचांना मऊ करण्यासाठी देखील वापरू शकता. जुन्या लिप बामने तुम्ही तुमचे शूज देखील चमकवू शकता.
३. आयशॅडोचे आयुष्य एक ते दीड वर्ष असते. एक्सपायर्ड झालेल्या आयशॅडो नेल पॉलिशमध्ये टाकून नेल पॉलिशची नवीन शेड सहज बनवता येते. हे करण्यासाठी क्लियर नेल पॉलिश घ्या आणि त्यात आयशॅडो पिग्मेंट घाला. हे मिक्स करा आणि वापरा.
४. मस्करा सहा ते आठ महिन्यांत वापरला पाहिजे. कारण तो लवकर एक्सपायर होतो. परंतु तो एक्सपायर झाल्यानंतर ते अजिबात फेकू नका. जर तुमच्या आयब्रो ग्रे होत असतील तर त्यांना कलर करण्यासाठी हा मस्काराचा वापर करता येतो.
५. फेस ऑइल खूप महाग असतात. जर तुमचे फेस ऑइल एक्सरपायर झाले असेल तर तुम्ही ते तुमच्या शरीरावर कोणत्याही काळजी न करता लावू शकता. फेस ऑइलमध्ये साखर घालून ते बॉडी स्क्रब म्हणून देखील सहज वापरता येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या