Beauty Tips : महिलांनो चुकुनही करू नका ‘या’ ५ ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर; सुंदर दिसण्याऐवजी होईल खूप त्रास!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Tips : महिलांनो चुकुनही करू नका ‘या’ ५ ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर; सुंदर दिसण्याऐवजी होईल खूप त्रास!

Beauty Tips : महिलांनो चुकुनही करू नका ‘या’ ५ ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर; सुंदर दिसण्याऐवजी होईल खूप त्रास!

Nov 18, 2024 03:28 PM IST

Do Not Use These Beauty Products : जर तुम्हीही तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी 'या' ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करत असाल, तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ही उत्पादने आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी बऱ्याच समस्या निर्माण करू शकतात.

ब्यूटी प्रोडक्ट्स
ब्यूटी प्रोडक्ट्स (Shutterstock)

Beauty Tips In Marathi : प्रत्येक स्त्रीला सर्वात सुंदर दिसण्याची इच्छा असते. सुंदर दिसण्याच्या प्रक्रियेत महिला अनेकदा अनेक प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. या ब्युटी प्रॉडक्ट्समुळे तुम्हाला काही काळ चांगलं वाटू शकतं, पण नंतर आरोग्य आणि त्वचा या दोन्ही गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. यातील काही उत्पादने अशी असतात की, ज्याची आपल्याला अजिबात गरज नसते. परंतु, कंपन्या आपल्या असुरक्षिततेला लक्ष्य करून त्यांची विक्रीही करतात. चला तर मग, आज आम्ही तुम्हाला अशाच काही मोठ्या कॉमन ब्युटी प्रॉडक्ट्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही देखील वापरत असाल, तर ताबडतोब फेकून देणे चांगले ठरेल.

त्वचा उजळवणारी क्रीम

आपल्या देशात लोकांना उजळ दिसण्याची वेगळीच आवड आहे. विशेषत: मुलींचा रंग थोडा गडद असेल, तर घरचेच नाही तर आजुबाजूचे लोक देखील तिला उजळ होण्याच्या टिप्स देऊ लागतात. याच वेडाचा फायदा मोठमोठ्या कंपन्यांनी घेतला आणि अनेक स्किन लाइटनिंग क्रीम बाजारात आणल्या आहेत. जर, तुम्हीही अशा क्रीम्सचा वापर करत असाल, तर आजच थांबवा. कारण, स्किन लाइटनिंग क्रीममध्ये अनेक धोकादायक ब्लिचिंग एजंट असतात, ज्यामुळे तुमची त्वचा लगेच चमकदार दिसते. पण, दीर्घकालीन वापरानंतर तुमचा चेहरा आणखी खराब होतो. याचबरोबर अशा क्रीम्स आपल्या मूत्रपिंड आणि मेंदूवर देखील परिणाम करू शकतात.

इंटिमेट वॉश

हल्ली महिलांमध्ये इंटिमेट वॉशचा वापरही झपाट्याने वाढत आहे. आपल्या प्रायव्हेट पार्ट्सला दुर्गंधीमुक्त, स्वच्छ आणि ताजे ठेवण्यासाठी स्त्रिया इंटिमेट वॉश वापरत आहेत. तथापि, आपल्याला अशा कोणत्याही उत्पादनाची अजिबात आवश्यकता नाही. योनी हा स्वत:  स्वतःची सफाई करणारा अवयव आहे, म्हणून जेव्हा आपण इंटिमेट वॉश वापरतो, तेव्हा ते योनीच्या पीएच पातळीत व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे त्या भागात खाज सुटणे, जळजळ आणि संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.

हेअर डाय

बदलत्या ट्रेंडनुसार तुम्हीही वारंवार केसांचा रंग बदलत असाल, म्हणजेच हेअर डायचा जास्त वापर करत असाल, तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. खरं तर, हे हेअर डाय एवढ्या धोकादायक रसायनापासून बनवलेले असतात की, त्यामुळे तुमचे केस झपाट्याने गळू लागतात. पण, त्याचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. अशावेळी केसांना रंग देण्यासाठी मेंदी, आवळा इत्यादी नैसर्गिक गोष्टींचा वापर करा.

Hair care tips : हेअर डायची गरज नाही! ही सोपी घरगुती पद्धत वापरून लपवू शकता पांढरे केस

ड्राय शॅम्पू

आजकाल ड्राय शॅम्पू देखील महिलांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. घाईघाईत आपल्या चिकट आणि घाणेरड्या केसांना स्वच्छ करण्याचा हा सर्वात सोपा आणि जलद मार्ग आहे. तथापि, ड्राय शॅम्पूचा जास्त वापर आपल्या केसांसाठी धोकादायक ठरू शकतो. जास्त ड्राय शॅम्पू वापरल्याने टाळूची छिद्रं बंद होतात, ज्यामुळे रक्ताभिसरण थांबतं आणि केस वेगाने गळू लागतात.

हेअर रिमूव्हल क्रीम

शरीराचे केस काढण्याचा सर्वात सोपा आणि वेदनामुक्त मार्ग म्हणजे हेअर रिमूव्हल क्रीम वापरणे. मात्र, बाजारात मिळणारे बहुतेक हेअर रिमूव्हल क्रीम अत्यंत धोकादायक रसायनांपासून बनवलेले असतात, जे तुमच्या शरीरासाठी अजिबात चांगले नसतात. या क्रीम्समुळे त्वचा काळवंडणे, जळजळ, खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवतात. तसेच, ही रसायने त्वचेतून आत जाऊन आपल्या आरोग्यास हानी पोहोचू शकतात. अशावेळी तुम्ही अशा क्रीम्सचा चांगला ब्रँड निवडणं महत्त्वाचं आहे. याशिवाय वॅक्सिंग आणि शेव्हिंग सारखे पर्याय देखील खूप चांगले आहेत.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner