Face Mask for Instant Glow: नवरात्रीला सुरुवात झाली असून, अवघ्या काही दिवसांवर दसरा सण आला आहे. १२ ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या दसऱ्याला सुंदर दिसण्यासाठी महिला, मुलींची आतापासून तयारी सुरु झाली आहे. अशा वेळी ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळताना पार्लरसाठी वेळ काढू शकत नसाल तर हे २ फेस मास्क तुमची समस्या सोपी करू शकतात. हे दोन फेस मास्क चेहऱ्यावर लावल्याने सन टॅनपासून सुटका होण्याबरोबरच चेहऱ्यावरील गमावलेली चमकही परत मिळवता येते. हे फेस मास्क चेहऱ्यावर लावल्यानंतर त्याचा फास्ट परिणाम दिसण्यासोबतच हे बनविणे सोपे आहे. त्यामुळे तुम्हालाही घरबसल्या आपल्या डल झालेल्या त्वचेला नवी चमक द्यायची असेल तर हे फेस मास्क ट्राय करा.
स्किन टोन सुधारण्यापासून ते गमावलेली चमक परत मिळवण्यापर्यंत बेसन खूप प्रभावी मानले जाते. तर दहीमध्ये असलेले अनेक पौष्टिक गुणधर्म त्वचेचे आरोग्य टिकवून ठेवण्याचे आणि त्याची चमक वाढवण्याचे काम करतात. बेसन आणि दह्याचा फेस मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन आणि दही २-१ या प्रमाणात मिसळावे. दोन्ही घटक चांगले मिक्स करा, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या शिल्लक राहणार नाहीत. आता हे मिश्रण चेहऱ्यावर समप्रमाणात लावा आणि १५-२० मिनिटे कोरडे राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
जर तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव असेल तर या केळीच्या फेस मास्कचा तुमच्या त्वचेवर जादुई परिणाम होऊ शकतो. केळीमध्ये असलेले पौष्टिक गुणधर्म कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवू शकतात. केळीचा फेस मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये पिकलेले केळी मॅश करावे. यानंतर केळीमध्ये एक चमचा मध घालून दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा. आता हा तयार केलेला केळीचा मास्क चेहऱ्यावर २० मिनिटे लावा आणि सुकू द्या. २० मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून मॉइश्चरायझर लावावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या