Home remedies for yellow teeth: हास्य आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. परंतु आपले दात जर पिवळे असतील तर आपले हास्यसुद्धा बिघडते. बऱ्याचवेळा दात पिवळे झाल्याने चारचौघांत दिलखुलास हसणेही कठीण होते. अशावेळी अनेक महागडे उपाय करूनही फरक पडत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायाने तुमचे दात हिऱ्यासारखे चमकतील. मीठ हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नसते.
जेवणात मीठ नसेल किंवा कमी असेल तर जेवणाचा आस्वाद कमी होतो. मीठ जेवणाची चव तर वाढवतोच पण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यातही फायदेशीर आहे. मीठ तोंडाच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. मीठाने दात स्वच्छ केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. यामुळे दात चमकदार आणि हिरड्या निरोगी राहतात. शिवाय मीठ तोंडाची पीएच पातळी राखते. ज्यामुळे दातांमध्ये बॅक्टेरिया जमा होत नाहीत. आज आपण मिठाचा विविध प्रकारे वापर करून दातांचा पिवळेपणा कसा घालवायचा याबाबत जाणून घेणार आहोत.
लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिड असते. जे नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. दातांचा पिवळेपणा साफ करण्यासाठी तुम्ही मीठ आणि लिंबाचा रस वापरू शकता. यासाठी तुम्ही चिमूटभर मीठ घ्या. त्यात ३ ते ४ थेंब लिंबाचा रस आणि थोडे पाणी घाला. आता ही पेस्ट बोटावर घेऊन दातांवर हलक्या हाताने चोळून घ्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून १ ते २ वेळा याचा वापर केल्याने पिवळेपणा दूर होऊन, तुमचे दात चमकदार बनतील.
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी मीठ फायदेशीर ठरू शकते. यासाठी दोन चिमूट मीठ घ्या. आता त्यात एक चमचा मोहरीचे तेल घाला. नंतर हे मिश्रण बोटावर घेऊन दातांवर लावा. आणि दात स्वच्छ करा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. याच्या नियमित वापराने दातांवर साचलेली घाण साफ होऊन दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र होतील.
दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही आलं आणि मीठ मिसळून वापरू शकता. यासाठी तुम्ही २ चिमूटभर मीठ घ्या. त्यात आले पावडर आणि मध घाला. आता ही पेस्ट दातांवर लावा आणि हळुवार चोळा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे बॅक्टेरिया टाळण्यास मदत करतात. यामुळे श्वासाच्या दुर्गंधीपासूनही सुटका मिळू शकते.
दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही मीठ आणि बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी २ चिमूट मीठामध्ये एक चिमूटभर बेकिंग सोडा मिक्स करा. आता हे मिश्रण टूथब्रशच्या मदतीने दातांवर लावा. ब्रशने २ ते ३ मिनिटे हळूवारपणे दात घासून घ्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमचे दात चमकदार तर होतीलच पण श्वासाच्या दुर्गंधीपासूनही सुटका मिळेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)