Bamboo Jewellery: चंद्रपूर जिल्ह्यात तयार केलेल्या बांबूच्या दागिन्यांची काळाघोडा फेस्टिवलमध्ये महिलांकडून मोठी मागणी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bamboo Jewellery: चंद्रपूर जिल्ह्यात तयार केलेल्या बांबूच्या दागिन्यांची काळाघोडा फेस्टिवलमध्ये महिलांकडून मोठी मागणी

Bamboo Jewellery: चंद्रपूर जिल्ह्यात तयार केलेल्या बांबूच्या दागिन्यांची काळाघोडा फेस्टिवलमध्ये महिलांकडून मोठी मागणी

HT Marathi Desk HT Marathi
Feb 04, 2025 06:37 PM IST

Bamboo Jewellery- चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांबूचे उत्पादन होते. मीनाक्षी वाळके यांनी बांबूपासून बनवलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन काळाघोडा फेस्टिवलमध्ये आयोजित करण्यात आले होते.

चंद्रपूर येथून आलेल्या मीनाक्षी वाळके यांचा बांबूच्या दागिन्यांना काळाघोडा फेस्टिवलमध्ये मोठी मागणी होती
चंद्रपूर येथून आलेल्या मीनाक्षी वाळके यांचा बांबूच्या दागिन्यांना काळाघोडा फेस्टिवलमध्ये मोठी मागणी होती

मुंबईच्या फोर्ट परिसरात सुरू असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात चंद्रपूरसारख्या दुर्गम, आदिवासी भागातील बांबूच्या कलाकृती लोकप्रिय ठरल्या. त्यात बांबू दागिन्यांचे मुंबईकरांना अक्षरशः वेड लागल्याचे दिसून आले. चंद्रपूरच्या बांबू कलावंत आणि बांबू कार्यकर्त्या मीनाक्षी मुकेश वाळके यांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या यशस्विनी उपक्रमाद्वारे महोत्सवात सामील होण्याची संधी मिळाली. राज्य कृषी मूल्य आयोगाचे चेअरमन पाशा पटेल, चित्रपट दिग्दर्शक जयंत सोमलकर, निर्मात्या शेफाली भूषण यांनीही स्टॉलला भेट देऊन बांबूपासून बनविलेल्या दागिन्यांच्या कलाकुसरबद्दल माहिती करून घेतली.

‘कोण होणार करोडपती’ मध्ये सेलिब्रिटी पाहुण्या राहिलेल्या मीनाक्षी या बांबू प्रशिक्षणाद्वारे आदिवासी आणि वंचित महिलांना बांबूपासून वस्तू निर्मितीचे शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवत आहे. या माध्यमातून गेल्या ७ वर्षात ४ राज्यांतील एक हजाराहून अधिक महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. मीनाक्षी या चंद्रपूरच्या गोंडवाना विद्यापीठात 'बांबू' विषयाच्या अभ्यागत प्राध्यापक सुद्धा आहेत. मीनाक्षी या बांबूपासून राख्या, की-चेन, दिवे, तोरण, गणेश मूर्ती, तिरंगा ध्वज निर्मिती करून देश आणि विदेशात निर्यात करत असतात. इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पुरस्कृत मीनाक्षी यांच्या बांबूच्या कलाकृती अप्रतिम आहेत. त्यांनी देशातील पहिले बांबू QR कोड स्कॅनर डिझाइन करुन या क्षेत्रात विक्रम केला आहे.

काळा घोडा कला महोत्सवात मीनाक्षी वाळके यांच्या बांबुच्या ईतर कलाकृतीं सोबतच बांबूपासून बनविलेले हार, झुमके, बांगड्या हे दागिने विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले होते. अनोख्या संकल्पनांनी बांबूला सुंदर दागिन्यांमध्ये लीलया रूपांतरित करण्याच्या शैलीने मुंबईकर महिलांना वेड लागल्याचे दिसले.

मीनाक्षी यांनी जागतिक दर्जाच्या ‘मिस क्लायमेट’ सौंदर्य स्पर्धेसाठी बांबूचा मुकुट डिझाइन केला होता. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या यशस्विनी उपक्रमामुळे इथपर्यंत पोहोचू शकल्याचे त्या म्हणाल्या. 

सचिन तेंडुलकरने बनावे बांबूचे ॲम्बेसिडर

बांबूला फ्युचर मटेरियल म्हटले जाते. भारताला हे भविष्य घडवायचे असेल तर नियोजित शासनाधार मिळाला पाहिजे. ध्येय धोरणे ठरवताना तळागाळातील बांबू कारागीर कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे लागेल. चंद्रपुरात गेल्या बारा वर्षांपासून बांबू संशोधन केंद्र आहे. मात्र त्यात एकही संशोधन झाले नाही. प्रशिक्षणात दर्जा नाही. यासाठी कृषि आणि तंत्र विद्यापीठाशी या केंद्राची नाळ जोडली जावी. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने बांबूच्या वस्तुंच्या प्रसारासाठी ब्रँड ॲम्बेसेडर बनावे, अशी इच्छा मीनाक्षी वाळके यांनी व्यक्त केली. 

 

Whats_app_banner