Back Pain Relief : बैठ्या जीवनशैलीमुळे वाढतेय पाठदुखी! कशी घ्याल स्वतःची काळजी? जाणून घ्या तज्ज्ञांकडून...
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Back Pain Relief : बैठ्या जीवनशैलीमुळे वाढतेय पाठदुखी! कशी घ्याल स्वतःची काळजी? जाणून घ्या तज्ज्ञांकडून...

Back Pain Relief : बैठ्या जीवनशैलीमुळे वाढतेय पाठदुखी! कशी घ्याल स्वतःची काळजी? जाणून घ्या तज्ज्ञांकडून...

Nov 25, 2024 02:49 PM IST

Back Pain Relief Tips In Marathi : प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना पाठदुखीची समस्या सतावते. हे दुखणे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीवर नकारात्मक परिणाम करते.

Back Pain Relief Tips In Marathi 
Back Pain Relief Tips In Marathi 

Back Pain Relief Tips In Marathi : वाढत्या वयामुळे, धकाधकीच्या जीवनामुळे लोकांमध्ये पाठदुखीची समस्या वाढत आहे. जड ओझे उचलणे, सतत खाली वाकणे, जड वस्तू अयोग्य पद्धतीने उचलणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मणक्याला मार बसणे, अशी अनेक कारणे पाठदुखीला कारणीभूत ठरू शकतात. मात्र, या कारणांपेक्षा ऑफिसमधील खुर्चीत तासन् तास एकाच स्थितीत बसण्याची सवय पाठदुखीसाठी कारणीभूत ठरते. वाढलेले वजन, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, जास्तव्यायाम तसेच व्यायाम न करणे यामुळे पाठदुखी वाढते.

प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना पाठदुखीची समस्या सतावते. हे दुखणे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीवर नकारात्मक परिणाम करते. तीव्र पाठदुखी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थकवा आणणारी असू शकते, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. म्हणून पाठदुखीकडे दुर्लक्ष करु नका, असे ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉ. आयुष शर्मा सांगतात.

पाठदुखी कशामुळे होते?

बैठी जीवनशैली : कामाचे वाढते तास,व्यस्त जीवनशैली ही तुमच्या मणक्याच्या आरोग्यावर परिणाम करू शकते ज्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो. शारीरिक हालचालींचा अभाव आणि दीर्घकाळ स्क्रीन्ससमोर बसल्याने तुमचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. पोक काढून बसणे किंवा चुकीच्या स्थितीत बसणे यांसारख्या सवयींमुळे मणक्याचे दुखणे वाढते.

लठ्ठपणा : लठ्ठपणाचा त्रास असलेले लोक अनेकदा पाठदुखीची तक्रार करताना दिसतात. त्यांची ही समस्या काही महिने किंवा वर्षांपर्यंत टिकून राहते. जास्त वजनामुळे तुमच्या मणक्यावर, विशेषतः पाठीच्या खालच्या भागावर अतिरिक्त ताण येतो. याकडे दुर्लक्ष केल्यास दैनंदिन कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

धूम्रपान : धूम्रपानाच्या सवयी तुमच्या मणक्याच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. यामुळे मणक्यातील डिस्कचे नुकसान होऊन त्याची झीज होते. निकोटीन, सिगारेटमध्ये असलेले हानिकारक द्रव्य मणक्यातील रक्त प्रवाह अडथळा आणतात, ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता वाटू लागते.

दुखापत : पाठीच्या दुखापती जसे की, पाठीवर येणारा अतिरिक्त ताण, अचानक दुखापत होणे तसेच फ्रॅक्चरमुळे तुमच्या मणक्याचे आरोग्य बिघडू शकते. अपघात, घसरुन पडणे, जड वजन उचलणे आणि जास्त प्रमाणात शारीरिक व्यायाम केल्याने पाठीच्या दुखापती होऊ शकतात. या दुखापतींकडे किरकोळ वेदना म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

Diabetes care : मधुमेहाच्या रुग्णांनी देशी तूप खावे की नाही? आहारातून काढून टाकण्याआधी जाणून घ्या!

स्लीप डिस्क : पाठीचा मणका हा २६ हाडांनी बनलेला असतो. प्रत्येक हाडांच्यामध्ये मऊ चकती असते. ही चकती दोन भागात असते. चकतीचा आतला भाग मऊ, मांसल असतो तर, बाहेरचे कवच कठीण असते. कोणतीही जखम किंवा आजारपण यांमुळे चकतीचा मऊ भाग कठीण कवचाच्या बाहेर ढकलला जातो. यालाच स्लिप डिस्क म्हणतात. यामुळे गंभीर पाठदुखी होते.

तणाव : झोपेचा अभाव, नैराश्य किंवा चिंता यामुळे देखील पाठीच्या वेदना वाढतात.

अँकिलोझिंग स्पाँडिलायटिस : हा एक प्रकारचा संधिवात आहे, जो पाठीच्या कण्यावर दुष्परिणाम करतो, ज्यामुळे मणक्यामध्ये जळजळ होते. यामुळे एखाद्याला पाठदुखीची समस्या सतावू शकते.

सायटिका : ही एक अशी स्थिती आहे, जी सायटिक नर्व्ह या मार्गावर पसरते, जी पाठीच्या खालच्या भागातून, नितंब आणि पायातून खाली जाते. यामुळे तुमच्या कंबरेपासून ते पायापर्यंत असह्य वेदना होतात. या स्थितीत कंबरेपासून पायाच्या मागच्या भागातून खाली पसरणारी तीक्ष्ण वेदना होतात.

पाठदुखीचे व्यवस्थापन कसे कराल? 

> चालताना किंवा बसताना, पाठ सरळ ठेवा, यामुळे तुमचा पाठीचा कणा ताठ राहतो. 

> वाकून बसल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होत असते. विशेषतः ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवत असलेल्या व्यक्तींनी बसताना पाठ नेहमी सरळ ठेवली पाहिजे. 

> जास्त प्रमाणात पाठदुखी होत असेल, तर नियमित योगासने करा, त्यामुळे स्नायूंची क्षमता वाढते आणि पाठीचा कणा लवचिक बनतो. 

> मणक्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान ५ मिनिटे स्ट्रेचिंग करा. 

> जर तुम्ही जास्त वेळ एकाच ठिकाणी बसत असाल कर तर एक किंवा दोन तासांनंतर वारंवार ब्रेक घ्या. 

> तुमच्या पाठीला आधार देण्यासाठी तुम्ही कुशन्सचा वापर करु शकता. 

> हाडे मजबूत ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, लोह, जस्त, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा समावेश निरोगी आणि पोषक आहार घ्या. 

> दुखापतीमुळे किंवा स्पॉन्डिलायटिसमुळे पाठदुखी झाल्यास, पाठदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी औषधे, फिजिओथेरेपी, शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू शकते. 

> एखाद्याची पाठदुखी दिवसेंदिवस वाढत असल्यास शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय ठरतो. तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि पाठीची अत्यंत काळजी घ्या.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner