Back Pain Remedies: मार्च एंडमुळे वाढलेल्या कामाच्या तासांमुळे पाटदुखी सतावतेय? आराम देतील हे उपाय-back pain due to extended working hours due to march end these remedies will give you relief ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Back Pain Remedies: मार्च एंडमुळे वाढलेल्या कामाच्या तासांमुळे पाटदुखी सतावतेय? आराम देतील हे उपाय

Back Pain Remedies: मार्च एंडमुळे वाढलेल्या कामाच्या तासांमुळे पाटदुखी सतावतेय? आराम देतील हे उपाय

Mar 26, 2024 07:38 PM IST

Back Pain: मार्च एंड आला की कामाचा ताण वाढतो. त्यामुळे तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने अनेकांना पाठदुखीची समस्या त्रास देऊ लागते. यापासून आराम मिळवण्यासाठी उपाय जाणून घ्या

पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी उपाय
पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी उपाय (unsplash)

Remedies To Get Relief From Back Pain: मार्च एंडमुळे कामाचे तास वाढले आहे. दिवसाचे ८ ते १० तास सलग बसून काम केल्याने पाठ, मणका यांच्या तक्रारी उद्भवतात. अशावेळी काही ठराविक उपाय केल्यास या पाठदुखीवर मात करता येऊ शकते.वाशी येथील फोर्टिस हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, संचालक डॉ. प्रमोद भोर यांनी पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

मार्च महिला म्हटला की सगळ्यांना आपले टार्गेट पूर्ण करण्याचे वेध लागतात. या महिन्यात कामाचे तासही वाढतात. विविध कारणांमुळे पाठदुखी वाढू लागते. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे कामाचे वाढते तास आणि बदलते हवामान हे आपल्या स्नायू आणि सांध्यावर परिणाम करतात. तासनतास एका ठिकाणी बसणे किंवा बसण्याच्या चुकीच्या पध्दतीमुळे पाठीच्या स्नायूंवर ताण येतो. थंडीच्या महिन्यांत शारीरिक हालचालींचा अभाव देखील स्नायू कमकुवत करण्यास कारणीभूत ठरू शकतात. ज्यामुळे आपण मार्चमध्ये अचानक व्यायामास सुरुवात केली तर अधिक वेदना होण्याची अधिक शक्यता असते. मार्चच्या अखेरीस कामाचा वाढता तणाव देखील पाठदुखीस कारणीभूत ठरतो. शिवाय व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकदा स्वत:ची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि त्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या काळात पाठदुखी कमी करण्यासाठी खालील टिप्सची मदत घ्या.

पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी उपाय

- पाठदुखीवर सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे नियमित स्ट्रेचिंग करणे. तुमच्या डेली रुटीनमध्ये कॅट काउ पोझ, बालासन, आणि कोब्रा पोझ यांसारख्या योगासनांचा समावेश केल्याने मणक्याच्या आजूबाजूच्या स्नायूंमधील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

- दीर्घ श्वासोच्छ्वास, ध्यान किंवा सौम्य योग यासारख्या रिलॅक्सिंग तंत्रांची अंमलबजावणी करणे ही पाठदुखीचा सामना करण्यासाठी महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. ताण आणि तणाव अनेकदा स्नायूचा कडकपणा आणि पाठीच्या वेदनेस कारणीभूत ठरतात. म्हणून तणावाचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.

- दीर्घकाळ बसून किंवा उभे असताना योग्य शारीरीक पोश्चर राखल्यास पाठदुखीचा धोका कमी होतो. खुर्ची वापरणे किंवा दिवसभर स्ट्रेचिंगसाठी लहान ब्रेक घेणे यासारख्या गोष्टी नक्कीच फायदेशीर ठरु शकतात. या सोप्या उपायांना प्राधान्य देऊन, तुम्ही मार्चच्या अखेरीस कामच्या व्यस्त वेळापत्रकातही पाठदुखीला दूर ठेवू शकता.

- तुमच्या मणक्यावरील भार कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे निरोगी वजन राखणे गरजेचे आहे. जास्त वजन स्नायूंवरील अतिरिक्त दबाव आणतात आणि त्यामुळे पाठदुखी वाढु शकते. म्हणून निरोगी वजन राखल्यास आपल्या एकूण मणक्याचे आरोग्य लक्षणीयरीत्या सुधारता येऊ शकते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)