Foods to Avoid During Monsoon: कडक उन्हाळ्यानंतर येणारे पावसाळ्यातील आल्हाददायक हवामान नक्कीच खूप सुंदर असते. मात्र, या मोसमातही वेगळ्या समस्या आहेत. सर्वात मोठी अडचण म्हणजे या हंगामात आहारात किंचितही हलगर्जीपणा झाला नाही की आजारी पडण्याची शक्यता बळावते. सर्व प्रकारचे व्हायरल फिव्हर, टायफॉईड, डेंग्यू असे अनेक धोकादायक आजार या ऋतूत झपाट्याने पसरतात. विशेषतः मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. असे काही पदार्थ आहेत जे टाळणे चांगले असते. आयुर्वेद असो वा आधुनिक विज्ञान, पावसाळ्यात या गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. चला तर मग जाणून घेऊया अशाच पाच गोष्टींबद्दल जे तुम्ही टाळू शकता, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.
पावसाळ्यात होणारे आजार टाळायचे असतील तर हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे. कारण या ऋतूत ओलावा वाढल्याने कोबी, पालक, लेट्यूस इत्यादी हिरव्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि परजीवी वाढू लागतात. अशा भाज्या नीट स्वच्छ आणि नीट शिजवल्या नाहीत तर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि पचनसंस्था बिघडू शकते. अशा वेळी त्या टाळणेच उत्तम ठरते.
स्ट्रीट फूड कितीही स्वादिष्ट असलं तरी आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत अनहेल्दी आहे. आता ऋतू कोणताही असला तरी अनेकदा स्ट्रीट फूड न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र, विशेषत: पावसाळ्यात हे पदार्थ काटेकोरपणे टाळावेत. गाडीवर विकले जाणारे चाट, टिक्की, समोसा, पकोडे असे स्ट्रीट फूड अस्वच्छ पद्धतीने तयार केले जाते. अशावेळी ते खाल्ल्याने आजारांचा धोका वाढू शकतो.
पावसाळ्यात सीफूड सुद्धा टाळावे. पावसाळ्यात मासे, खेकडे, कोळंबी इत्यादी सी फूड सहज दूषित होतात आणि पाण्यात आढळणारे आजारही ते खाणाऱ्या व्यक्तीवर परिणाम करू शकतात. अशावेळी फूड पॉयझनिंगसारखे धोकादायक आजारही होऊ शकतात. म्हणूनच पावसाळ्यात हे पदार्थ टाळले पाहिजेत.
कोणत्याही ऋतूत बराच काळ कापलेली फळे खाणे टाळावे. परंतु पावसाळ्यात ते विशेषतः टाळले पाहिजेत. चिरलेली फळे उघडी ठेवली तर ती अजिबात खाऊ नयेत. विशेषत: हातगाडीवर विकली जाणारी फ्रूट चाट टाळणे चांगले. गाडीवर ठेवलेल्या कापलेल्या फळांवर माश्या उडतात, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.
पावसाळ्यात काही दुग्धजन्य पदार्थांच्या वापरातही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनेकदा बाजारात दही, पनीर सारखी उत्पादने अत्यंत घाणेरड्या पद्धतीने तयार केली जातात. तसेच त्यांच्या साठवणुकीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. अशावेळी ते खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. पावसाळ्यात जीवाणूंच्या वाढीचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, ज्यामुळे ही उत्पादने आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. अशावेळी शक्यतो ताज्या डायरी प्रोडक्टचाच वापर करावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)