Makhana Kheer Recipe: आज, म्हणजे १७ जुलै रोजी राज्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. वर्षभर येणाऱ्या एकादशींपैकी ही एकादशी मोठी मानली जाते. पांडुरंगांच्या भेटीच्या ओढीने कितीतरी दिवसांपासून विविध ठिकाणांहून वारकरी पायी चालत निघतात. तर अनेक लोक विविध विठ्ठल मंदिरांमध्ये पूजा करतात. पांडुरंगाला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे नैवेद्य देखील अर्पण केले जातात. तुम्हाला सुद्धा घरी प्रसाद अर्पण करायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही नैवेद्यासाठी मखाना खीर बनवू शकता. विशेष म्हणजे ही खीर तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता. ही खीर फक्त टेस्टी नाही तर अनेक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे. चला तर मग जाणून घ्या कशी बनवायची मखाना खीर.
- २०० ग्रॅम मखाना
- २ लिटर दूध
- ५० ग्रॅम देशी तूप
- २५० ग्रॅम साखर
- १०० ग्रॅम मनुका
- १० बदाम
- १० काजू
- ५-१० काड्या केशर
- ४ हिरवी वेलची
मखाना खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम बदाम आणि काजूचे छोटे तुकडे करून बाजूला ठेवा. यानंतर गॅसवर मंद आचेवर कढई ठेवून त्यात तूप घालून गरम करा. तूप गरम झाल्यावर त्यात बदाम, काजू आणि मखाना घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. यानंतर भाजलेले मखाना आणि ड्राय फ्रूट्स एका भांड्यात काढून बाजूला ठेवा. यातील अर्ध्याहून अधिक भाजलेले ड्राय फ्रूट्स काढून ग्राइंडरमध्ये बारीक करून त्याची पावडर तयार करावी.
आता यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात दूध गरम करावे. दूध उकळू लागल्यावर त्यात साखर, वेलची पूड, केशर आणि बारीक केलेली ड्राय फ्रूट्सची पावडर घालून हे मिश्रण एक मिनिट ढवळून घ्या. नंतर बाजूला ठेवलेले उरलेले काजू, बदाम आणि मखाना घाला.
आता खीरचे संपूर्ण मिश्रण क्रीमसारखे होईपर्यंत सुमारे १५ मिनिटे उकळू द्या. यानंतर गॅस बंद करून दुसऱ्या भांड्यात खीर काढून घ्या. यात वरून ड्राय फ्रूट्सचे काप टाकून सजवा. तुमची मखाना खीर तयार आहे. पांडुरंगाला नैवेद्याला अर्पण करा.
संबंधित बातम्या