How Smoking Affect Future Generation: धुम्रपानामुळे होणाऱ्या विविध प्रकारच्या कर्करोगांमुळे लाखो लोक आपले मौल्यवान जीवन गमावतात. हा एक मृत्यूस कारणीभूत होणारा घटक आहे जो टाळता येऊ शकतो. धूम्रपानामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनमानावरच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांसाठी देखील घातक ठरतो. हे एक ज्ञात सत्य आहे की सिगारेटमधील हानिकारक रसायनांमुळे फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, मूत्रपिंड आणि मूत्राशयाचा कर्करोग, हृदयविकार आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांसह विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात ज्यामुळे देशात मृत्यू आणि विकृती दर वाढत आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आजूबाजूला राहून पॅसिव्ह स्मोकिंग / सेकंड हँड स्मोकिंगमुळे इतरांनाही अनेक प्रकारचे कर्करोग होतात. धूम्रपानाचा फक्त तुमच्या आयुष्यावरच नाही तर भावी पिढीवर सुद्धा परिणाम होतो. दरवर्षी ३१ मे रोजी तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त चिपळूण येथील ऑन्को-लाइफ केअर कॅन्सर सेंटरचे हेड अँड नेक ऑन्को सर्जन डॉ. एहसान शेख यांनी धूम्रपानाचा भावी पिढीवर आणि जीवनावर कसा परिणाम होतो हे सांगितले.
- सिगारेटच्या धुरात कर्करोग निर्माण करणारे पदार्थ असतात, ज्याला CARCINOGEN म्हणतात. हे फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतात आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका निर्माण करतात. धूम्रपानामुळे इतर कर्करोग जसे की घसा, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, मूत्राशय आणि पोटाच्या कर्करोगाचाही धोका वाढतो.
- गर्भधारणेदरम्यान धुम्रपान केल्याने न जन्मलेल्या बाळावर देखील परिणाम होतो ज्यामुळे अकाली जन्म, कमी वजनाचे बाळ आणि विकासात्मक समस्या उद्भवतात. सेकंड हँड स्मोकींगमुळे मुलांना पुढील आयुष्यात श्वसन संक्रमण / अस्थमा / COPD आणि हृदयविकारासारख्या इतर आरोग्यविषयक गुंतागुंत होण्याचा धोका असतो. विशेष थेरपीचा अवलंब करून धूम्रपानासारखी वाईट सवय सोडणे ही काळाची गरज आहे.
- धूम्रपानाचे व्यसन टाळणे हे भविष्यातील पिढ्यांवर सकारात्मक परिणाम करू शकते. म्हणून निरोगी भावी पिढीकरिता आरोग्यदायी सवयींचा अवलंब करणे गरजेचे आहे. धूम्रपान सोडल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगासारख्या तंबाखू-संबंधित आजारांना प्रतिबंध करणे शक्य होईल आणि भविष्यातील पिढ्यांचे जीवन दर्जेदार होण्यास हातभार लागेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)