Skin Care in Air Pollution: वायू प्रदूषणापासून आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टींची काळजी घेत असाल. पण त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? जेव्हा हवा प्रदूषित होते, तेव्हा त्वचा त्याच्या नकारात्मक प्रभावापासून वाचू शकत नाही. प्रदूषित हवेमुळे त्वचेला श्वास घेणे कठीण होते. प्रदूषकांमुळे त्वचेचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होते, ज्यामुळे एलर्जी, एक्जिमा, पुरळ, सोरायसिस किंवा त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. त्वचेवर वायू प्रदूषणाचा सर्वात सामान्य परिणाम म्हणजे त्वचेचे नुकसान आणि अकाली वृद्धत्व. वाहने आणि पॉवर प्लांटमधून निघणाऱ्या धुरात नायट्रोजन डायऑक्साइड असते. त्यामुळे त्वचेवर काळे किंवा तपकिरी डाग पडतात.
जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असलेले पदार्थ खा. कारण ते प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांपासून त्वचेचे संरक्षण करतात. लाल, पिवळी किंवा नारिंगी फळे खा. कारण त्यात कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, जे एक नैसर्गिक सनस्क्रीन आणि अँटी ऑक्सिडेंट आहे. नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या. हे त्वचेला प्रदूषकांशी लढण्यास मदत करते.
हिवाळ्यात पाणी पिणे कमी करू नका. ६-८ ग्लास पाणी आणि इतर द्रवपदार्थ पुरेसे प्रमाणात प्या. तुम्ही आवळा किंवा तुळशीच्या पानांनी डिटॉक्स वॉटरही घरी तयार करू शकता. याच्या सेवनाने शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यास मदत होतेच. शिवाय अत्यावश्यक अँटी-ऑक्सिडंट्सही मिळतात.
प्रदूषणामुळे त्वचेचा रंग खराब होतो आणि ती निर्जीव बनते. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे चांगले. त्वचेला आतून मॉइश्चराइझ करण्यासाठी आठवड्यातून दोनदा त्वचेवर कोको बटर पेस्ट लावा. तुम्ही ऑलिव्ह ऑइल देखील वापरू शकता. हे पेशींच्या पुनर्बांधणीस प्रोत्साहन देते आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. आंघोळीनंतर फक्त तीन ते पाच मिनिटांनी मॉइश्चरायझर लावा. कारण यावेळी त्वचा मॉइश्चराइझर चांगल्या प्रकारे शोषून घेते.
कच्च्या पपईचा गरही तुम्ही त्वचेवर चोळू शकता. फक्त २० सेकंद असे केल्याने त्यात आढळणारे नैसर्गिक एन्झाइम्स तुमच्या चेहऱ्यावरील काळेपणा दूर करतील. प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांना तोंड देण्यासाठी चॉकलेट फेस पॅक देखील एक उत्तम पर्याय आहे.
जर तुम्ही दररोज फक्त १० सेकंद तुमची त्वचा स्क्रब केली तर ते प्रदूषणाशी लढण्यास मदत करेल. स्क्रब बनवण्यासाठी अक्रोड बारीक करुन घ्या. त्यात थोडी साखर आणि ऑलिव्ह ऑईल घाला. याने फक्त १० सेकंद चेहरा हलक्या हाताने स्क्रब करा. तुम्ही साखर, मध आणि लिंबाचा रस घालून देखील स्क्रब तयार करू शकता.
उन्हाळ्यातच नव्हे तर हिवाळ्यातही त्वचेवर सनस्क्रीन लावा. हे त्वचेवर एक संरक्षण स्तर तयार करते, जे केवळ अतीनील किरणांपासून संरक्षण करत नाही तर स्मोग पार्टिकल्सला देखील अडकवते आणि या हानिकारक कणांना छिद्रांद्वारे त्वचेमध्ये प्रवेश करू देत नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)