मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  आफ्रिकेत 'मंकीपॉक्स' या नव्या रोगाचं थैमान; हजारोंना लागण झाल्याची शक्यता

आफ्रिकेत 'मंकीपॉक्स' या नव्या रोगाचं थैमान; हजारोंना लागण झाल्याची शक्यता

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 20, 2022 09:12 AM IST

Monkeypox Outbreaks : आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणात पसरत असलेल्या मंकीपॉक्स या नव्या रोगामुळं तज्ज्ञांसमोर एक नवीन आव्हान उभं राहिल आहे. याशिवाय या आफ्रिकन देशांमध्ये या घातक रोगामुळं अनेक लोक बाधित असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Monkeypox Outbreaks In Africa
Monkeypox Outbreaks In Africa (HT)

Monkeypox Outbreaks In Africa : गेल्या दोन वर्षांपासून जग आधीच कोरोना महामारीपासून हैराण असताना आता आफ्रिकेत आणखी एक नवा व्हायरस सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्स या नव्या आजारानं थैमाण घातलं असून या आजारानं हजारो लोक बाधित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नायजेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये या रोगाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचं दिसून आलं आहे. याशिवाय ब्रिटन पोर्तुगाल, स्पेन आणि अमेरिकेतही या व्हायरसचे रुग्ण वाढत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं आफ्रिकेत जन्मलेला हा रोग पुन्हा जगभरात गोंधळ घालणार का, याबाबत अंदाज लावले जात आहे.

काय आहेत या रोगाची लक्षणं?

मानवी शरीरावर विशिष्ट प्रकारच्या पुळ्या येणं आणि जोराचा ताप येणं हे या घातक रोगाचं लक्षण मानलं जात आहे. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात. हा रोग सर्वप्रथम माकडांमध्ये आढळला होता, त्यानंतर तो संसर्गानं मानवांमध्येही पसरला असल्याचं बोललं जात आहे. या रोगाच्या उपचाराबाबत शास्त्रज्ञांनी शोध सुरु केला असून त्यावरील उपचार पद्धती विकसित होण्यासाठी काही वर्ष लागू शकतात, असाही अंदाज काही वैद्यकिय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

कसा होतोय प्रसार?

मंकीपॉक्स या आजाराचा प्रसार हा संसर्गाच्या माध्यमातून होत आहे. एका व्यक्तीला या रोगाचं झालेल्या संसर्गामुळं अनेक लोकांना याची बाधा होण्याची शक्यता असते. हा रोग लोकांमध्ये सहज पसरत नाही आणि सामान्य लोकांना धोका खूप कमी आहे, तरी देखील या आजाराबद्दल खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

या रोगाची बाधा झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास व्यक्तीला याची लागण होते. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असते. त्यामुळं या रोगापासून बचाव करण्यासाठी दररोज कमीत कमी लोकांना भेटणं आणि सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळणं हे सर्वोत्तम पर्याय मानले जात आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या