पावसाळ्यात मोठ्यांसह मुलांनाही होतेय पोटाची समस्या, दुषित अन्न, पाण्यामुळे वाढतेय संसर्गाचे प्रमाण
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  पावसाळ्यात मोठ्यांसह मुलांनाही होतेय पोटाची समस्या, दुषित अन्न, पाण्यामुळे वाढतेय संसर्गाचे प्रमाण

पावसाळ्यात मोठ्यांसह मुलांनाही होतेय पोटाची समस्या, दुषित अन्न, पाण्यामुळे वाढतेय संसर्गाचे प्रमाण

HT Marathi Desk HT Marathi
Published Jul 15, 2025 01:03 PM IST

पावसाळ्यात फक्त प्रोढच नाही तर लहान मुलांमध्ये सुद्धा पोटाच्या समस्या वाढत आहे. पावसाळ्यात दूषित अन्न आणि पाण्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत आहेत.

stomach problems in monsoon
stomach problems in monsoon

पावसाळ्याच्या दिवसात हवेतील आर्द्रता, सांडपाणी साचणे, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने लहान मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे ६ ते १० वयोगटातील मुलांमध्ये पोटाच्या समस्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही आठवड्यात पोटदुखी, पोटफुगी, उलट्या आणि जुलाब यासारख्या तक्रारींमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. वेळीच व्यवस्थापन केल्यास भविष्यातील गुंतागुत टाळता येऊ शकते. पालकांना सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.

पावसाळा मुलांमध्ये पोटाच्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतो, जो एक चिंतेचा विषय ठरत आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढते तसेच वाढत्या आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंची वाढ जलद गतीने होते. ज्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अजूनही विकसित होत नाही, ते विशेषतः असुरक्षित असतात. रस्त्यावरील उघडे अन्न पदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधा होऊ शकते,. सामान्य लक्षणांमध्ये पोटात दुखणे, मळमळ, उलट्या, अतिसार, गॅस आणि ताप यांचा समावेश आहे. गेल्या ३-४ आठवड्यात, १० पैकी ७ बालरुग्ण ओटीपोटात दुखणे, अतिसार आणि उलट्या अशा समस्यांसह ओपीडीमध्ये दाखल झाली होती. वेळीच उपचार न केल्यास, या परिस्थितीमुळे डिहायड्रेशन तसेच थकवा येऊ शकतो. वेळेवर योग्य निदान आणि उपचार जसे की ओआरएसचे सेवन करुन डिहायड्रेशन टाळणे, अँटीबायोटिक्स (जर आवश्यक असेल तर) आणि हलका व संतुलित आहार. उपचारास विलंब केल्यास लक्षणे आणखी बिघडू शकतात आणि मुलाच्या वाढीवर आणि दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो. स्वच्छता आणि आहार नियंत्रणाद्वारे प्रतिबंध हा सर्वोत्तम मार्ग आहे अशी प्रतिक्रिया डॉ. सिद्धार्थ मदभूशी( नवजात शिशु तज्ञ आणि वैद्यकीय संचालक, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, औंध, पुणे) यांनी व्यक्त केली.

डॉ. मदभूशी पुढे सांगतात की, पालकांनी खात्री करावी की तुमची मुल गाळून,उकळून थंड केलेल्या पाण्याचे सेवन करते. उघड्यावरील अन्न पदार्थ, कच्चे सॅलड आणि कापलेली फळे टाळावीत. घरी शिजवलेले ताजे व गरम अन्न, दहीसारख्या प्रोबायोटिक्ससह हलके जेवण द्यावे, जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुवावे, मुलांना हायड्रेट ठेवावे आणि जंक फूड जास्त प्रमाणात खाणे टाळावे. शिवाय वरील लक्षणे २४ तासांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. निमित नागदा( इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, झायनोवा शाल्बी हॉस्पिटल, मुंबई सांगतात की, पावसाळ्यामुळे २५-५० वयोगटातील प्रौढांमध्ये दुषित अन्न आणि पाण्यामुळे होणारे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. अतिसार, अपचन, जठरास आलेली सूज, पोटदुखी, पोटफुगी, मळमळ आणि उलट्या यासारख्या जठरासंबंधी समस्या सामान्य आहेत मात्र दैनंदिन जीवनातील काही चांगल्या सवयींनी या टाळता येऊ शकतात. गेल्या ३-४ आठवड्यात ओपीडीत आलेल्या १० पैकी ५ प्रौढांनी अतिसार, पोटदुखी, मळमळ आणि उलट्या आणि ताप यासारख्या लक्षणांची तक्रार केली आहे. वरील समस्य टाळण्यासाठी गाळून,उकळून थंड केलेले पाणी प्या, उघडयावरील अन्नपदार्थांचे सेवन टाळा आणि घरी शिजवलेल्या व ताज्या अन्नाचे सेवन करा. आजारी पडू नये म्हणून हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या तसेच वेळीच वैद्यकीय मदत घेतल्यास अशा आजारातून लवकर बरे होता येते हे लक्षात असू द्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner