Achari Paneer Roll Recipe : मुलांना रोज टिफिनमध्ये तेच तेच पदार्थ दिले तर, त्यांना ते खायला अजिबात आवडत नाही. यामुळे एका आईसाठी आपल्या बाळाला रोज टिफिनमध्ये काय जेवण द्यावं, जे हेल्दी आणि टेस्टी दोन्ही असेल, याचा विचार करणं देखील खूप अवघड असतं. अशा वेळी पनीरपेक्षा दूसरा चांगला ऑप्शन काहीच असू शकत नाही. मुलांना पनीर खायला आवडत असलं, तरी तरीही मुलांना त्याचा एखादा पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ करून खायला देणं इतकं सोपं काम नाही. मात्र, वेगवेगळ्या पद्धतीने पनीरचे पदार्थ बनवून तुम्ही ते मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अचारी पनीर रोल कसा बनवायचा हे सांगणार आहोत, जो अतिशय चविष्ट आहेच, पण तो तुम्ही पटकन तयार करू शकता.
आचारी पनीर रोल बनवणे अगदी सोपे आहे. परंतु, चांगली गोष्ट म्हणजे मुलांना त्याची चव देखील नक्कीच आवडेल आणि ते काही मिनिटांतच टिफिन फस्त करतील. पाहा, लहान मुलांच्या टिफिनसाठी अचारी पनीर रोल कसा बनवावा…
चपाती,
१ कप पनीर,
अर्धा कप घट्ट दही,
१ टीस्पून मीठ,
१ टीस्पून काश्मिरी मिरची,
अर्धा टीस्पून हळद,
१ टीस्पून आचरी मसाला,
१ टीस्पून चाट मसाला,
अर्धा टीस्पून कसुरी मेथी,
अर्धा टीस्पून धणे पूड,
अर्धा कप शिमला मिरची,
१ टीस्पून ओरेगॅनो,
२ मोठे चमचे तंदुरी चीज स्प्रेड
आचारी पनीर रोल बनवण्यासाठी एका वाटीत घट्ट दही घेऊन त्यात मीठ, काश्मिरी मिरची पूड, हळद, चाट मसाला, धणे पूड, आचारी मसाला एकत्र मिसळा. नंतर त्यात आले लसूण पेस्ट घाला. हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यावर त्यात पनीरचे तुकडे घाला आणि नंतर काही वेळ म्हणजे ५-१० मिनिटे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या. नंतर एका कढईत तेल गरम करून या तेलात शिमला मिरची हलकी भाजून घ्या आणि बाजूला ठेवा. नंतर त्याच कढईत मॅरिनेट केलेले पनीर चांगले तळून घ्या. आता एका ताटात पोळी घेऊन त्यावर तंदूरी चीज स्प्रेड लावून घ्या. आता त्यावर ओरेगॅनो घाला आणि पसरवा. नंतर, यावर पनीर मधोमध ठेवून त्यावर तळसून घेतलेली शिमला मिरची घाला. आता पोळी रोल करून तळाशी फॉइल पेपर किंवा बटर पेपर ठेवून गुंडाळा. टेस्टी आचारी पनीर रोल झटपट झाला तयार! आपण रोलचे दोन तुकडे करून ते मुलांच्या टिफिनमध्ये ठेवू शकता.
संबंधित बातम्या