मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Morning Routine: आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यावर अवश्य करा या गोष्टी, सर्व आजार होतील दूर

Morning Routine: आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यावर अवश्य करा या गोष्टी, सर्व आजार होतील दूर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 25, 2024 09:00 AM IST

Ayurveda Tips: दिवसाची सुरुवात कशी करावी यासंबंधी अनेक गोष्टी आयुर्वेदात सांगण्यात आल्या आहेत. सकाळी काही गोष्टींचा अवलंब केल्याने दिवस सुरू होण्यापूर्वी तुम्हाला स्वतःला चार्ज करण्यास मदत होईल. तुमच्या काही सवयी बदलून तुम्ही तुमचा दिवस चांगला बनवू शकता.

मॉर्निंग रुटीन
मॉर्निंग रुटीन (unsplash)

Morning Routine After Waking Up: आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी आपल्या सवयीनुसार आपल्या रूटीनचा भाग बनतात. यातील काही सवयी नकळत तयार होतात आणि त्या नित्यक्रमाचा भाग बनून आपले नुकसान करू लागतात. पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकाल अशा काही सकारात्मक सवयी जाणीवपूर्वक तयार करू शकता. अशा काही साध्या पण जीवन बदलणाऱ्या सवयी आहेत ज्या तुम्ही सकाळी उठल्यावर अंगिकारल्या तर तुमचा दिवस आणखी सुंदर होईल. दिवसाची सुरुवात कशी करावी यासंबंधी अनेक गोष्टी आयुर्वेदात सांगण्यात आल्या आहेत. सकाळी या काही गोष्टींचा अवलंब केल्याने दिवस सुरू होण्यापूर्वी तुम्हाला स्वतःला चार्ज करण्यास मदत होईल. पहा सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे.

सकाळी पाणी प्या

सकाळी सर्वात आधी एक ग्लास पाणी प्या. हे पाणी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास पोटाच्या समस्याही दूर होतात. हे सकाळी तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत करते.

शरीर आतून स्वच्छ करा

सकाळी उठल्यानंतर शौच करणे आवश्यक आहे. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते. जर तुम्ही तुमचे शरीर आतून स्वच्छ केले तर तुम्ही दिवसभर सक्रिय राहाल.

जीभ स्वच्छ करा

दात घासताना जीभ सुद्धा खरवडून स्वच्छ केली पाहिजे. यामुळे रात्रभर तोंडातील मृत बॅक्टेरिया निघून जातात आणि तुमचे तोंड स्वच्छ होते. याशिवाय तुमची पचनक्रिया सुधारते.

डोक्याला हाताने मसाज करा

आपल्या डोक्याला मसाज करा. सकाळी उठल्यानंतर डोक्याला तेल किंवा गरम तेलाने मसाज करा. यामुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होतील आणि टक्कल पडणे यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळेल.

योगा करा

आयुर्वेदात सकाळी उठल्यानंतर व्यायाम करण्याचा उल्लेख आहे. योग किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम तुमचे शरीर लवचिक बनवते आणि तुम्हाला फिट बनवते. तसेच सकाळी व्यायाम केल्यास दिवसभर फ्रेश आणि सक्रिय राहाल. यामध्ये तुम्ही दीर्घ श्वास घेणे आणि ध्यान यांचाही समावेश करू शकता.

आयुर्वेदिक चहा प्या

तुमच्या नेहमीच्या चहाच्याऐवजी आयुर्वेदिक किंवा हर्बल चहा घ्या. सकाळी रिकाम्या पोटी रेग्युलर चहा प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. यात जळजळ आणि ॲसिडिटी सारख्या समस्यांचा समावेश होतो. त्याऐवजी हर्बल चहा प्या जे तुम्हाला अधिक सक्रिय करेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)